अमरावती : जुन्‍या वादातून चार ते पाच जणांच्‍या टोळक्‍याने एका युवकाला आधी दुचाकीने धडक दिली, नंतर चाकूने वार करून त्‍याची हत्‍या केली. ही थरारक घटना राजापेठ पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील केडीया नगर परिसरातील महापालिकेच्‍या उद्यानासमोर घडली. रोहित अमोल मांडळे (२५, रा. गोंडपुरा, राजापेठ) असे मृत युवकाचे नाव आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी सकाळी केडियानगर बगीच्या समोरील जागेचा पंचनामा केला. जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या तरुणांच्या जमावाने गुरूवारी मध्‍यरात्रीनंतर दुचाकीने रोहितला जोरदार धडक दिली. महापालिकेच्या या बगीच्याच्या प्रवेशद्वारालगत रोहित कोसळल्यानंतर अज्ञात आरोपींनी त्याला चाकूने भोसकून ठार केले.

तक्रारीनुसार रोहितच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. त्यासाठी रोहित सह त्याच्या भावाचे मित्र एकत्र आले होते. त्यांनी केक देखील सोबत आणला होता. दरम्यान अन्य एक मित्रासोबत बोलत असताना रोहित हा बगीच्याच्या बाहेर आला. त्‍यावेळी त्याला टोळक्याने दुचाकीने धडक दिली. तो खाली कोसळल्यानंतर त्याच्‍यावर चाकूने वार करण्यात आले. रात्री १२.३० च्या सुमारास रोहितला रक्तबंबाळ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान रोहितवर देखील काही गुन्हे दाखल होते. त्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता राजापेठ पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला ‘मराठी’ची भुरळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते, “ओटीटीच्या स्पर्धेत मराठी…”

चारचाकी वाहनातून गांजाची तस्‍करी

चारचाकी वाहनातून गांजा वाहून नेणाऱ्या दोघांना बडनेरा पोलिसांनी अंजनगाव बारी रोडवरील एका पेट्रोल पंपासमोरून अटक केली. त्यांच्याकडून ६.२० लाखांचा ३१ किलो गांजा, एमएच ३१ / डीसी ४२७८ ही चारचाकी व दोन मोबाईल असा एकूण ९ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेख मोहसीन शेख रशीद (३२, रा. फुबगाव, ता. नांदगाव खंडेश्वर) व शेख जुनेद शेख अकलिम (३१, रा. बुधवारा चौक, नांदगाव खंडेश्वर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात बडनेराचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गिते, सहायक निरीक्षक संदीप हिवाळे, उपनिरीक्षक तुषार गावंडे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : Wardha Rain News: अखेर सुट्टी मिळाली…पण केवळ ‘याच’ तालुक्यांना…

नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव पिंपरी गावात पाय घसरून नदीपात्रात पडल्यामुळे एकाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. शिवराम बाबूलाल सावलकर (वय ५५, रा. थूगाव पिंपरी, जि. अमरावती), असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे चांदूरबाजार पोलिसांनी सांगितले. पूर्णानदीच्या काठी गावात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे, त्याठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. गुरुवारला शिवराम हे जेवण करण्यासाठी तेथे गेले होते. जेवण करून परत घराकडे जात असताना नदीपात्राजवळ पाय घसरून ते पाण्यात बुडाले.