शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन केवळ दोन महिने झाले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना तेव्हा त्यांनी मेळघाटचा दौरा का केला नाही, तेव्हा ते झोपले होते का? असा सवाल करीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शनिवारच्या मेळघाट दौऱ्यावरून टीका केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी मेळघाटातील काही गावांमध्ये जाऊन तेथील आदिवासींशी संवाद साधला आणि कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेतला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने कुपोषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करायला हवी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यावर प्रतिक्रिया देताना राणा दाम्पत्याने अजित पवार यांच्या मेळघाट दौ-यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार अधिवेशनात कुपोषणाचा मुद्दा केव्हा मांडतात, त्याची आम्ही वाट पाहत आहोत, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच, मेळघाटातील बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो, याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने केली नाही. आपण स्वत: लोकसभेत हा विषय मांडला होता, असे नवनीत राणा यांनी सांगितले.
तेव्हा अजित पवार झोपले होते का? –
तर, महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री अमरावती जिल्ह्याच्याच होत्या. मेळघाटात तीन महिन्यांमध्ये पन्नासच्या वर बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मेळघाटात दिला जात होता, तेव्हा अजित पवार झोपले होते का?, असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला.
तर कदाचित ५० बालकांचे मृत्यू रोखता आले असते –
याचबरोबर, यशोमती ठाकूर या त्यावेळी महिला व बालविकास मंत्री होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी ठाकूर यांच्यावर कारवाई केली असती, तर कदाचित ५० बालकांचे मृत्यू रोखता आले असते. अजित पवार यांनी राज्य सांभाळले, अधिकारी आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पाठीशी घातले. आता मात्र आदिवासींची भेट घेत आहेत. अजित पवार यांनी योग्य वेळी कारवाई करायला हवी होती, असेही रवी राणा म्हणाले. याशिवाय, योजना राबविताना जे कंत्राटदार भ्रष्टाचार करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे नवनीत राणा यांनी बोलून दाखवलं.