लोकसत्ता टीम
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १४ ते १५ वर्षीय मुलीची एकाने छेड काढल्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्या तरुणाला हटकले. यावेळी त्या तरुणाने त्याच्या मित्रांना घेऊन मुलीचे घर गाठले आणि मुलीच्या आईला गंभीर मारहाण केली, तसेच दुचाकीची तोडफोड केली. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
एक चौदा वर्षीय मुलगी रस्त्याने जात असताना एका तरुणाने तीची छेड काढली. ही बाब मुलीने तीच्या वडिलांना सांगितली. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी त्या तरुणाला हटकले आणि यानंतर या रस्त्याने जायचे नाही, अशी समज दिली. त्यावेळी तो मुलगा त्या ठिकाणाहून निघून गेला. मात्र तासाभरानंतर तो तरुण त्याच्या पाच मित्रांना घेऊन मुलीच्या घरासमोर आला. यावेळी त्यापैकी काही जणांच्या हातात बेसबॉल स्टीक होती. त्यांनी या स्टीकव्दारे मुलीच्या घरासमोर उभ्या असलेल्या एमएच २७/ बीआर ८६५७ क्रमांकाच्या दुचाकीची तोडफोड केली, तसेच मुलीच्या आईला गंभीर मारहाण केली.
हेही वाचा – छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
हेही वाचा – ‘सरल अॅप’चा ताप व उमेदवारीचा धाक, भाजपा नेते कोंडीत
पोलिसांनी इम्रान खान बिस्मिल्ला खान, अ. सोहेल अ. शफी, शेख शोहेब शेख शकील, आकाश सागर, विकास चढार, संकेत सुर्वे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.