मोबाईल खरेदीसाठी उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी पाच जणांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याने १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. अज्वील दिलीप काटेखाये (रा. चिचाळ), असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्वीलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्वील याने कोंढा येथील १७ वर्षीय तरुणाकडून मोबाईल खरेदीसाठी १० हजार ५०० रुपये उसने घेतले होते. उसने दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी धीरज माकडे (रा. कोंढा), निखील चंद्रशेखर घोळके (२०), रजत हंसराज घोळके (१७) व पारस नरेंद्र बिलवणे (१६) सर्व रा. चिचाळ व समीर रामकृष्ण कूलरकर (४३, रा. अड्याळ) यांनी अज्वीलला त्रास देणे सुरू केले. त्यामुळे अज्वीलने आपल्या वडिलांची दुचाकी समीरकडे गहाण ठेवली होती. तरीही पैशाकरिता तगादा लावल्याने अज्वील तणावात होता. सततच्या त्रासाला कंटाळून त्याने गोसे धरणाच्या लहान पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. अज्वीलचे वडील दिलीप गेंदाजी काटेखाये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आरोपी धीरज माकडे, निखिल घोडके, रजत घोडके, पारस बिलवणे, समीर कुलरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.