नागपूर : समृद्धी महामार्गावर घासलेले टायर असलेल्या वाहनांना प्रवासास प्रतिबंध घालणे सुरू झाले असतानाच आज शुक्रवारी येथे एका कारचा टायर फुटून अपघात झाला. त्यात दोन मुलांसह चौघे थोडक्यात बचावले.
नागपूरहून ‘एमएच ०४ जीई ०७३५’ क्रमांकाची कार गुरुवारी समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना येळकेली ते पुलगावदरम्यान कारचा टायर फुटून ती बॅरिकेट्सला आदळली. यामुळे कारचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. कारची टाकी फुटून ऑईल रस्त्यावर पसरले. या मार्गावर वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) वायुवेग पथक वाहन तपासणीसाठी तैनात होते. त्यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. त्यात दोन लहान मुलांसह, दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश होता.
हेही वाचा – आशीष देशमुख काँग्रेसमधून निलंबित; स्वपक्षीय नेत्यांवर टीका भोवली
हेही वाचा – गडचिरोली : नक्षलग्रस्त नारगुंड्यात ‘वाय-फाय’सह सुसज्ज वाचनालय
पथकाने टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन रुग्णवाहिका व टोईंग व्हॅन मिळवून दिली. या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी या पथकातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सोबत भुयार यांनी नागरिकांना या महामार्गावर प्रवास करताना टायर तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले.