यवतमाळ: दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने स्वत:च्या मुलाची तेलंगणात विक्री केल्याची खळबळजनक घटना आर्णी तालुक्यातील कोपरा येथे उघडकीस आली. पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून पतीने हे कृत्य केले. मात्र पत्नीने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने विक्री झालेल्या चिमुरड्या मुलाची तेलंगणातून सुखरूप सुटका करण्यात आली. हा आंतरराज्यीय मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी आर्णी पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना वडील श्रावण दादाराव देवकर (३२), चंद्रभान लखडाजी देवकर (६५), दोघेही रा. कोपरा यांन अटक केली. तर कैलास लक्ष्मण गायकवाड (५५) रा. गांधीनगर आर्णी, अरविंद राम्मया उस्केमवार (३५) रा. भाग्य नगर आदिलाबाद आणि बोल्ली गंगाराजु गंगाराम (४५) रा. मोहनरावपेठ ता. कोर्डला जि. जगतीयाल (तेलंगणा) यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा… धुतलेल्या कोळशाने उष्मांक वाढत नसल्याने वीज महाग? स्वच्छ केलेल्या कोळशाचाही उष्मांक पाच महिन्यांपासून कमीच

श्रावणला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे पत्नी पुष्पा श्रावण देवकर (२७) ही त्रासाला कंटाळून मुलाला पतीकडे सोडून देवळी येथील मोठ्या बहिणीकडे एक महिन्यापूर्वी गेली होती. गुरुवारी मुलगा जय हा पतीकडे नसून त्याची कुणाला तरी विक्री केल्याची माहिती पुष्पाला मिळाली. त्यावरून तत्काळ कोपरा येथे जाऊन बघितले असता, मुलगा जय कुठेच आढळला नाही. मुलाची पतीने विक्री केल्याची कुणकुण तिला गावात लागली. पुष्पा हिने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार देताच पोलिसांनी तपास सुरू केला. हा गुन्हा अज्ञान बालकाच्या मानवी तस्करी संबंधाने असल्याने पोलिसांनी पीडित बालक व आरोपींचा शोध घेण्याकरीता दोन वेगवेगळे पथक तयार केले.

हेही वाचा… नायलॉन मांजाचे धागेदोरे गुजरात, उत्तर प्रदेशात

श्रावण देवकर व चंद्रभान देवकर यांना तत्काळ अटक केली. मुलगा जय यास तेलंगणा राज्यात विक्री केल्याची माहिती मिळताच आर्णी पोलिसांचे पथक तत्काळ तेलंगणा राज्यात रवाना झाले. या पथकाने १४ तास शोधमोहीम राबवून अदिलाबाद, कोर्डला जिल्हा जगतीयाल येथून पीडित मुलास सुखरूप ताब्यात घेतले व आरोपींना अटक केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्घ गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. श्रावण देवकर व चंद्रभान देवकर यांना पाच दिवसांची पोली कोठडी सुनावण्यात आली. हा गुन्हा आंतरराज्यीय मानवी तस्करीचा असल्याने सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आर्णीचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे, बाबाराव पवार, मनोज चव्हाण, आकाश गावंडे, अभय मिश्रा, देवानंदन मुनेश्वर, राजेश जाधव, मंगेश जगताप, जया काळे, मिथुन जाधव आदींनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An alcoholic father sold his son in telangana interstate human trafficking exposed in arni nrp 78 dvr
Show comments