चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वरोरा येथील दादा साहेब देवतळे शेतकरी भवन लोकार्पण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमातून वरोराचे आमदार प्रतिभा धानोरकर यांना डावलण्यात आहे. काॅंग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचा लाभ घेत काहींनी काॅंग्रेसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व काँग्रेस समर्थित विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवित काॅंग्रेसमध्ये भांडण लावणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी कार्यक्रमाला पाठ का दाखविली यांची जोरदार चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वरोरा येथील परिसरातीत दादा साहेब देवतळे शेतकरी भवनाच्या लोकार्पण आणि शेतकरी मेळावा काल शुक्रवारला आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार प्रतिभा धानोरकर यांना डावलण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, आमदार धोटे आणि आमदार अडबाले यांना निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेत धानोरकर यांचे नावसुद्धा टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे मात्र काॅंग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचा लाभ उचलून काहींनी काँग्रेसमध्येच आग लावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे वरोऱ्याचे रहिवासी असलेले जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दामोधर रुयारकर यांनीही या कार्यक्रमाच्या निमंत्रिण पत्रिकेत स्थान देण्यात आले नाही. याउलट बँकेशी कोणतीही संबंध नसलेले धनोजे कुणबी समाज मंडळ अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आले.
हेही वाचा – डोळे आलेले सर्वाधिक रुग्ण बुलढाण्यात, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा
ही पत्रिका बघताच हा पक्षाअंतर्गत भांडण लावण्याचा एकमेव कार्यक्रम असल्याचे आमदार धोटे यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क करून आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वडेट्टीवारांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस समर्थित आमदार अडबाले यांनीही कार्यक्रमाला जाणे टाळले. सुभाष धोटे आणि अडबाले हे दोन्ही आमदार आज चंद्रपुरातच होते. मात्र, कार्यक्रमाला गेले नाही. विरोधी पक्षनेत्यांसह दोन्ही आमदारांनी बहिष्कार टाकल्याने पक्षात दुहीचे बीज पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चपराक बसली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत स्वतः ला काँग्रेसी समजतात. परंतु त्यांनाही स्थानिक आमदाराचा विसर पडला कसा, असा प्रश्न बॅंकेतील काॅंग्रेस विचारसणीच्या संचालकांना पडला आहे. आम्ही गेलो नाही, असे सांगत आमदार धोटे यांनी यावर अधिक बोलणे टाळले आहे. मात्र, काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे लावण्याचा प्रयत्न काेण महाशय करीत आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.