अमरावती : विरोधकांनी ‘इंडिया’ नावाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी त्यांच्यात मतैक्य नाही. ‘एनडीए’कडे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. मात्र विरोधक कुणा एकाचे नावही घेऊ शकत नाहीत. विरोधकांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावे, ते तसे करूच शकणार नाहीत. देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सायंकाळी येथे बोलताना केला.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित नवचेतना महासभेत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे आदी उपस्थित होते. पटेल म्हणाले, राज्यात २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्या होत्या. ज्यांचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री हे १९९९ चे सूत्र त्यावेळी पाळले गेले असते, तर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाले असते आणि राज्यात वेगळे चित्र राहिले असते. काँग्रेससोबत सातत्याने युती करणे हे राष्ट्रवादीसाठी चुकीचे ठरले. युतीत आपल्या वाटय़ाला कमी जागा आल्या. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले.
प्रफुल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो. पण, सरकार कसे चालवायचे हे उद्धव ठाकरे यांना कळत नव्हते. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ते मंत्रालयात केवळ दोन वेळा गेले, हे लोकच सांगतात. अजित पवार मात्र करोनाचा काळ असतानाही दररोज मंत्रालयात पोहचून जनसामान्यांचे प्रश्न सोडवत होते.
संयमाचा अंत पाहू नका – आ. मिटकरी
अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात विरोधकांना इशारा दिला. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अजित पवार यांच्यावर टीका केली, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे ते म्हणाले. संजय खोडके यांनी आपल्या भाषणात विदर्भाच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. वेगळय़ा विचारांच्या लोकांसोबत सरकार चालवणे कठीण असते, पण आम्ही आमची विचारधारा बदललेली नाही, असे खोडके म्हणाले.
..तर आमचा निर्णय चुकीचा कसा?
राज्यात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ५४, तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. विरोधी बाकांवर बसण्याचा जनादेश होता. आम्हाला सत्ता स्थापन करण्याचा अधिकार मिळाला नव्हता, पण मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चाललेल्या रस्सीखेच स्पर्धेत आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. काँग्रेसचा शिवसेनेसोबत जाण्यास तीव्र विरोध होता. जर तो निर्णय चुकीचा नव्हता, तर आता आम्ही २०२३ मध्ये राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तो चुकीचा कसा ठरू शकतो, असा सवाल प्रफुल्ल पटेल यांनी केला.