वर्धा: आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयास राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील व अन्य यावेळी उपस्थित होते. विविध विषयावर यावेळी चर्चा झाली. नरेंद्र पाटील यांनी मंडळातर्फे प्रामुख्याने मराठा समाजासाठी असलेल्या व्याज परतावा योजनांची माहिती दिली. तेव्हा पाटील यांनी स्वतः संगणकावर बसून कर्ज मंजुरी, व्याज परतावा व अन्य बाबी समजून घेतल्या. एवढेच नव्हे तर ४ हजार ३३३ लाभार्थ्यांना ३ कोटी ७५ लाख रुपये परताव्याची रक्कम वितरित करून टाकली, अशी माहिती वर्धा जिल्हा समन्वयक सागर आंबेकर यांनी दिली. या भेटीत पाटील यांनी मंडळाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
हेही वाचा… गडकरी यांनी राजकीय नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…
मंडळाची स्वतःची जागा नसल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली. मंडळासाठी लवकर जागा मिळावी म्हणून नवी मुंबईत भव्य वास्तू उभारण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन पण त्यांनी दिले. भेटीत मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते उपस्थित होते.