लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : नागपूरसह विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तान्हा पोळ्यानिमित्त सगळ्याच वयोगटातील लोक लाकडी बैल घेऊन त्याची पुजा करून हा सन आनंदाने साजरा करतात. नागपुरातील या सणाला तब्बल २३५ वर्षांचा इतिहास आहे. त्यातच नागपुरातील सनियर भोसला पॅलेसमधील तब्बल आठ फुट उंचीचा लाकडी बैल सर्वांचे लक्ष वेधून घेतो. ३ सप्टेंबरला तान्हा पोळा आहे. त्यानिमित्त या सनाचा इतिहासाबद्दल आपण माहिती जाणून घेऊ या…

नागपुरातील लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्याला २३५ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण म्हणून साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला शहरातील अनेक भागात लाकडी बैलांचा पोळा भरतो. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा होत नाही.

आणखी वाचा-शिंदे, फडणवीसांचा गैरसमज, ती याचिका ‘लाडकी बहीण’ योजनेविरूद्ध नाही, वडपल्लीवार म्हणाले…

सन १७८९ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरू केला. त्यांनी लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता. राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून सर्व लहान मुलांना वाटले. जिवंत बैलांप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट पुडे अशा विविध वस्तू तेथे बांधण्यात आल्या. बैलाजवळ मुलांना उभे करून बैलांची पूजा केली जायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटले जायचे.

आता या प्रथेला २३५ वर्षे पूर्ण होत आहेत. आजही पूर्वीप्रमाणेच या सणाची प्रथा सुरू असल्याची माहिती रघुजी महाराज भोसले यांचे प्रसिद्धीप्रमुख सारंग ढोक यांनी दिली. दरम्यान, यंदाही ३ सप्टेंबरला सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे या सणानिमित्त लहान मुलांचा लाकडी बैलाचा पोळा भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-Bail Pola Festival 2024 : बैलांचा साज महागला, संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे पोळ्यावर निराशेचे सावट

सीनियर भोसला पॅलेसमध्ये लाकडी बैल

तान्हा पोळ्याची प्राचिन काळापासून चालत आलेली प्रथा आजही राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी कायम ठेवली आहे. त्यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आजही बघता येतो. या लाकडी बैलाची उंची आठ फूट तर लांबी सहा फूट एवढी आहे. या बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिरवणूक निघेल, असेही सारंग ढोक यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An eight foot wooden bull history of tanha pola in nagpur mnb 82 mrj