लोकसत्ता टीम
बुलढाणा: येथील आठ वर्षीय बालकाने राज्यातील सर्वोच्च असलेले कळसुबाई शिखर सर करून स्वतःसह जिल्ह्याचा लौकिक या शिखरावर रोवला. महत्त्वाकांक्षा, निर्धार, नियोजन याला परिश्रम व जिद्द याची जोड दिली तर सर्वोच्च चमत्कार होतो, हे त्याने दाखवून दिले. वडील एक वृत्तपत्र विक्रेता आणि गिर्यारोहणाची कौटुंबिक परंपरा नसताना त्याने गाठलेले ‘यशोशिखर’ कौतुकास्पद ठरले आहे.
तनिष्क माधव देशमुख, असे या पराक्रमी बालकाचे नाव असून तो स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकत आहे. सुटीच्या दिवशी वडिलांसोबत परिसरातील लहानमध्यम डोंगर, शिखर चढण्याचा सराव त्याने केला. महाराष्ट्रातील सर्वात उंच (५४२७ फूट) कळसुबाई हे शिखर सर करण्याचा निर्धार त्याने केला. तनिष्क वडिलांसोबत १ मे च्या रात्री दीड वाजता इगतपुरीला पोहोचला. तिथे थोडी विश्रांती घेत रात्री ३.१५ वाजता त्याने कळसुबाईवर चढाई सुरू केली. सकाळी सव्वा सहा वाजता सूर्योदयाला शिखर सर केले.
हेही वाचा… मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली व मित्रांसह ताडोबात दाखल
तनिष्कच्या निर्धाराची माहिती होताच बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व बुलढाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा कोमल झंवर यांनी त्याला सर्वतोपरी मदत करून पाठबळ दिले. शिक्षक गव्हारे व श्रीमती पुनम यांनी त्याला मार्गदर्शन केले. बुलढाण्यात दाखल झाल्यावर स्थानिक बुलढाणा अर्बनच्या मुख्य शाखेत त्याचा चांडक यांनी सत्कार केला.
हेही वाचा… वाघांच्या अधिवासाने समृद्ध ‘अंबाबरवा’ मध्ये आज प्राणिगणना, वन्य विभागाची जय्यत तयारी
तनिष्क आपल्या यशाचे श्रेय वडील माधव रामराव देशमुख, आई श्रद्धा देशमुख व समस्त देशमुख परिवार, जिल्हा अॅथलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक समाधान टेकाळे तसेच सहकार विद्या मंदिरच्या शिक्षकांना देतो.