नागपूर : शेजारी मुलाशी भांडल्याने आई रागावण्याच्या भीतीने घर सोडलेला एक आठ वर्षांचा मुलगा नागपूर रेल्वेस्थानकावर भेदरलेल्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना आढळला. त्यांनी त्याची विचारपूस करून त्याला चाईल्ड लाईनच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन केले.

गांधीबाग येथील  चौथ्या वर्गात शिकणाऱ्या या मुलाचे मंगळवारी सकाळी खेळता खेळता शेजारच्या मुलाशी भांडण झाले. या भांडणात त्यांनी एकमेकांना मारले. भांडल्याचे आईला कळेल आणि ती आपल्याला रागवेल, या भीतीने मुलगा घरी गेलाच नाही.  तो  थेट   नागपूर   रेल्वेस्थानकावर   पोहोचला. सकाळी    ९   वाजताच्या सुमारास तो नॅरोगेज फलाटावर    बसून    होता.   महिला आरपीएफ उषा तिग्गा आणि सुषमा ढोमणे यांना तो दिसला.

एकटा आणि भेदरलेला अवस्थेत असलेल्या या मुलाची त्यांनी विचारपूस केली असता, त्याने पळ काढला. आरपीएफ जवान विकास शर्मा यांना तो पळताना दिसला. तो कारच्या मागे लपला असता विकासने त्याला जवळ घेतले आणि त्याची विचारपूस केली.

त्याला  ठाण्यात आणले व पत्ता विचारला. एका माजी नगरसेवकाच्या मदतीने त्याचा पत्ता शोधून काढण्यात आला. त्याच्या आईवडिलांना या घटनेची माहिती दिली. आरपीएफने त्याला पालकांच्या स्वाधीन केले.