यवतमाळ : सोने व पैसे लुटण्याच्या उद्देशाने झोपेत असलेल्या महाराजासह वृद्ध सेवेकरी महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना यवतमाळ तालुक्यातील तळेगाव सज्जनगड येथे मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत दिवसभर संभ्रम होता, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा उलगडा झाला.
लक्ष्मण चपंतराव शेंडे (९०), पुष्पा बापूराव होले (७५), रा. सज्जनगड, तळेगाव, अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत चार आरोपींना अटक केली. आशीष ज्ञानेश्वर लिल्हारे (२२), सूरज सुभाष बहिठवार (२४), सुभम सुभाष बहिठवार (२४), सर्व रा. खानगाव आणि अशोक पांडुरंग भगत (५१), रा. कार्ली, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – चिमुकल्या कर्करुग्णांनी राखीतून जोडले ऋणानुबंध, मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन
सज्जनगड येथे महाराजासह सोबत राहणार्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. यामुळे मृत्यू नेमका कसा झाला, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. दरम्यान परिसरात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. पंचनामा करताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर मृत्यूचे खरे कारण समोर आले. त्यात डोक्यावर मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोघांचाही खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवून संशयितांना ताब्यात घेतले. महाराजांकडील सोने व पैसे लुटण्याच्या उद्देशाने खून केल्याची कबुली मारेकर्यांनी दिली.