नागपूर: अमरावती रोडवरील सातनवरी गावातील फार्म हाऊसवर जमिनीवर झोपलेल्या वृद्धेला विषारी साप चावला. तिच्या पतीने काठीने सापाला ठार मारले. त्यानंतर प्रथम जवळचे रुग्णालय आणि त्यानंतर नागपुरातील मेडिकल रुग्णालय गाठले. वृद्धेने पिशवीतून मेलेला साप दाखवताच डॉक्टर थक्कच झाले. महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.
मीनाबाई कलम (वय – ६२) असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. मीनाबाई आपल्या पतीसोबत अमरावती रोडवरील सातनवरी गावातील फार्म हाऊसवर काम करतात, पती-पत्नी दोघेही फार्म हाऊसच्या परिसरातील झोपडीत राहतात. ३१ ऑक्टोबर रोजी झोपडीत ते जमिनीवर झोपले होते. रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास मीनाबाई यांना साप चावला. आरडाओरड केल्याने त्यांचे पतीही जागे झाले. त्यांना ४ फूट साप दिसला. त्यानंतर पतीने शेजाऱ्यांच्या मदतीने सापाला काठीने ठार केले. त्यानंतर पती आणि मीनाबाईच्या बहिणीने त्यांना वानाडोंगरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा… सावधान! येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
मात्र, रुग्णालयाने आधी १० हजार रुपये जमा करण्याची अट घातली. परंतु पैसे नसल्याने रुग्णाला सर्पमित्राच्या मदतीने मेडिकल रुग्णालयात हलवले गेले. यावेळी महिलेने आपल्या सोबत प्लास्टिकच्या पिशवीत मृत सापालाही आणले. साप पाहून काही वेळेसाठी खळबळ उडाली. डॉक्टरांनी मृत साप हा विषारी असल्याचे ओळखून त्या दृष्टीने उपचाराला सुरुवात केली.