नागपूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव करत विजय प्राप्त केला. या विजयाचे शिल्पकार असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर २०१९ नंतरच्या घटनाक्रमाची आठवण ताजी करत युट्युबवर भावनिक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेला लोकांचा विश्वास या शीर्षकाखाली हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. व्हिडिओची सुरुवात २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस असलेल्या २४ ऑक्टोबरपासून होते. यात त्यांना उद्धव ठाकरे यांनी कशाप्रकारे धोका दिला याची क्लिप दाखविण्यात आली आहे.
विजय सत्याचा??✌️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024
The Chronology.. The Recap !#MahaYutiWins #MaharashtraElection2024 #Maharashtra pic.twitter.com/L8WMFu6c3R
यानंतर ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हू लौट कर वापस आऊंगा..’ या वाक्यासह फडणवीस यांनी कशाप्रकारे राज्याच्या राजकारणात मेहनत केली याचे चित्रण करण्यात आले आहे. २०२२ मधील राज्यसभा निवडणूक २०२२ मध्ये फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला होता.
‘माझ्याशी लढले तर ईश्वर सत्यानाश करतो’ असे फडणवीस बोलताना दिसतात. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविणे ते पुन्हा लोकसभा निवडणुकीत अपेक्षित विजय प्राप्त न करणे, असे अनेक उतार-चढाव यात दाखविण्यात आले आहे.
‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले भी कही तुफानो का रूख मोड चुका हू..’ या वाक्यासह फडणवीस पुन्हा गर्जना करताना व्हिडिओमध्ये दिसतात. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’ या वाक्यासह फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांचे आभार मानले आहे. समाज माध्यमावर फडणवीस यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.