भंडारा : साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील एक आदिवासी कुटुंब आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह मागील १६ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये अशोक पंधरे, त्याची पत्नी व दोन मुले यांचा समावेश असल्याचे साकोली येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
बेपत्ता कुटुंबाविषयी ११ मार्च रोजी सानगडी येथील एका इंटरनेट कॅफेमधून पोलिसात ऑनलाइन तक्रार करण्यात आली आहे. परंतु १५ मार्चपर्यंत तक्रारीविषयी चौकशीची कुठलीही हालचाल होत नसल्याने अशोक पंधरे यांचे काका जयपाल पंधरे यांनी साकोली पोलिसात तक्रार दिल्याचे सांगण्यात आले. परंतु पोलिसांनी या घटनेविषयी गंभीर्य घेतले नाही, असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला आहे. त्यामुळे काका जयपाल पंधरे यांनी अखिल भारतीय आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांच्याकडे घटनेविषयी सांगितले. आदिवासी संघटनेने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दोन-तीन दिवस वाट बघा नंतर पुढील कार्यवाही करू असे सांगितले.
हेही वाचा – चंद्रपूर: नगरोत्थान निधी वाटपावरून भाजपात घमासान, नगरसेवक नाराज
याविषयी सविस्तर असे की, शालू अशोक पंधरे रा. सिरेगावटोला यांची वडिलोपार्जित शेती सावरबंध येथील भूखंड क्रं. ४५५ मध्ये आहे. या शेतीच्या काही भागावर विलास प्रभू बडवाईक सावरबंध यांनी अतिक्रमण करण्याच्या हेतूने बांधकाम सुरू केले. याबाबत साकोली पोलिसात तक्रार नोंद असून पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील जागेत पंधरे यांनी धान रोवणी केली होती. परंतु विलास बडवाईक यांनी अर्ध्या रात्रीच धान कापून चोरून नेल्याचे सांगण्यात आले. पोलिसात रीतसर तक्रार करूनही विलास बडवाईक यांनी त्या जागेवरील ताबा सोडला नाही. त्यामुळे शालू अशोक पंधरे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना १३ मार्चला कुटुंबासाह आत्मदहन करण्याचे निवेदन दिले होते. परंतु त्यापूर्वीच पंधरे कुटुंब बेपत्ता झाले. त्यामुळे शंकेला पेव फुटले आहे. या जमीन प्रकरणात भूमिअभिलेख व महसूल विभागाच्या दिशाभूलमुळे पंधरे कुटुंब मानसिक तणावात होते, असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास करून आरोपीस अटक करावी व पंधरे कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा आदिवासी समाज तीव्र आंदोलन करील, असा इशाराही देण्यात आला आहे.
पत्रपरिषदेत आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते बिसन सय्याम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी, बिरसा फायटर्सचे उपाध्यक्ष प्रमोद वरठे, नॅशनल पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष धर्मराज भलावी, सुरेश पंधरे, जयपाल पंधरे, भाऊराव कुंभरे, नीलमचंद कुंभरे, वसंता मेश्राम, परसराम पंधरे, देवचंद वाळवे, रवि सरोते, हिरामण पंधरे, योगेश कुंभरे, विनोद तुमडाम व इतर नेते कार्यकर्ते उपस्थित होते.