नागपूर : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐनवेळी नागपुरातून लोकसभा निडवणूक लढवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चांगली टक्कर दिली होता. त्याचा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लाभ झाला. त्यामुळे यावेळी देखील गडकरी यांना तोडीसतोड उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मुंबईतील आढावा बैठकीत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे म्हणाले, पक्षाने नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी यांना तोडीस तोड उमेदवार द्यावा. लोकसभेत कमकुवत उमेदवार दिला आणि तो मोठ्या फरकाने पराभूत झाला तर त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होत असतो. मागच्या निवडणुकीत ऐनवेळी नाना पटोले यांना नागपुरातून उमेदवारी मिळाली तरी ते ताकदीने लढले. तसाच उमेदवार आताही हवा, असे ठाकरे यांनी सूचवले.

हेही वाचा – गडचिरोली : हत्तीण पाणी पिण्यासाठी चक्क हापशीवर; व्हायरल व्हिडीओची समाजमाध्यमांवर चर्चा

या बैठकीला माजी मंत्री विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आमदार अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

हेही वाचा – निवडणुका आल्‍या की विशिष्‍ट धर्म निशाण्‍यावर, आमदार बच्‍चू कडू यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

रामटेक काँग्रेसकडेच हवे

रामटेक लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड राहिला आहे. ही जागा मित्रपक्षांना न सोडता काँग्रेसनेच लढावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. रामटेकच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह उपाध्यक्ष किशोर गजभिये, माजी आ. एस. क्यु. जमा, बाबा आष्टनकर, गज्जू यादव, तक्षशिला वाघधरे, नरेश बर्वे आदींनी मत मांडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An equal candidate against nitin gadkari is needed in nagpur demand of congress leaders rbt 74 ssb