अमरावती : एक अल्पवयीन मुलगी व तिच्या मित्राला त्यांच्या मैत्रीबाबत कुटुंबीयांना सांगण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर शेतात त्या दोघांची अश्लील चित्रफीत बनविण्यात आली. त्या आधारावर त्यांच्याकडून पैसेही उकळण्यात आले. तेवढ्यावरच न थांबता त्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजा राऊत, संदीप चौधरी व धनंजय अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी १५ मार्च रोजी पीडित मुलगी व तिच्या मित्राला त्यांच्या मैत्रीबाबत कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलगी व तिच्या मित्राला ऑटो रिक्षात बसवून एका शेतात नेले. या ठिकाणी आरोपींनी पीडित मुलगी व तिच्या मित्राला कपडे काढायला लावून त्यांची चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत दाखवण्याची व त्यांच्या मैत्रीबाबत कुटुंबीयांना सांगण्याची धमकी देत आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे घाबरून पीडित मुलगी व तिच्या मित्राने दोन दिवसांनी आरोपींना २ हजार रुपये दिले. त्यानंतरसुद्धा राजा राऊत हा पीडित मुलीला त्रास देत होता.
११ एप्रिल रोजी राजा राऊत व धनंजय यांनी पीडित मुलीच्या मित्राला पुन्हा दमदाटी केली. त्यानंतर राजा राऊत याने पीडित मुलीला धमकावत दुचाकीवर बसवून एका शेतात नेले. या ठिकाणी राजा राऊत याने तिचे लैंगिक शोषण केले. सदर घटनेनंतर पीडित मुलीने हिंमत करीत भाऊ व बहिणीकडे घटनाक्रम सांगितला. त्यानंतर चांदूर रेल्वे ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा – भाषण न करताही नागपूरमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवारच
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विनयभंग, खंडणी, बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.