नागपूर : अमळनेर येथे पुढील वर्षी फेब्रुवारीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, यात ‘गझलकार’रुपी आणखी एका ‘विद्रोहा’ची भर पडणार असल्याचे संकेत आहे. यामुळे साहित्य क्षेत्र पुन्हा ढवळून निघणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मागील चार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीनही दिवस कट्टा आयोजित करण्यात आला होता. त्यास मराठी गझलकट्टाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर पसंतीही मिळाली. परंतु, आगामी संमेलनासाठी स्थानिक आयोजक आणि साहित्य महामंडळाने एकच दिवस गझलकट्टासाठी देण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे. यामध्ये केवळ तीस जणांना कला सादर करता येणार आहे. हा अन्य गझलकारांवर अन्याय ठरत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गझलकार ‘विद्रोह’ करण्याच्या मनस्थितीत आहेत. विशेष म्हणजे, वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू झाली असून स्वतंत्र संमेलनासाठी निधी जमा करण्यात येत असल्याची माहिती काही गझलकारांनी दिली आहे.
हेही वाचा – शहरी भागातही पाणी टंचाईची चिन्हे! सव्वा कोटीचा आराखडा
दरम्यान, साहित्य महामंडळकडून एक दिवस गझलेसाठी देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. तर गझल प्रकार जाम गर्दी खेचू लागल्यामुळेच असा अन्यायकारक निर्णय घेतला जात असल्याचे गझलकार अझिझखान पठाण म्हणाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी गझल आपले पाय रोवत असतानाच, फेब्रुवारी २०२४ ला अमळनेरच्या ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकट्ट्यात केवळ ३० गजलकारांनाच संधी दिल्या जाईल, असा पवित्रा घेण्यात आला आहे. त्यामुळे गजलकारांना नाईलाजाने स्वतंत्र अखिल भारतीय गझल संमेलन घेण्याची वाट धरावी लागत आहे. – अझिझखान पठाण (गझलकार), वर्धा साहित्य संमेलन गझलकट्टा संयोजन समितीचे सदस्य