गोंदिया: बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, या विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा लवकरच पूर्ववत होणार आहे. येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास इंडिगो एअरलाइन्सने अनुकूलता दर्शविल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी पुढे आली होती. कंपनीने या अनुषंगाने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच बिरसी विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे विमान ‘टेक ऑफ’ करणार आहे.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, मागील वर्षी १३ मार्च २०२२ पासून या विमानतळावरून इंदूर – गोंदिया – हैदराबाद प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली होती. मात्र, ही सेवा प्रवाशांसाठी औटघटकेचीच ठरली; सहा महिन्यांतच ती बंद झाली.
हेही वाचा… केवळ विदर्भातच ६६ लाख बेरोजगार! वामनराव चटप म्हणाले, “यावर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय”
प्रवासी विमानसेवा पूर्ववत व्हावी, यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पाठपुरावा केला. त्यांनी काही विमान कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर इंडिगो कंपनीने यासाठी अनुकूलता दर्शविली. दोन दिवसांपूर्वीच या कंपनीने कर्मचारी भरतीची जाहिरात काढली आहे.
‘या’ मार्गावर सुरु होणार सेवा
इंडिगो कंपनी बिरसी विमानतळावरून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इंदूर प्रवासी विमानसेवा सुरू करणार आहे. कदाचित डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होऊ शकते. पूर्वप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण बिरसीचे वरिष्ठ अधिकारी शफीक शाह यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले.