अमरावती : हातचलाखी दाखवून व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ही टोळी रायगड व ठाणे जिल्ह्यातील गुन्ह्यांत फरार होती. त्यांना संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावर अब्बास काझीम हुसेन (३६), खादम हुसैन काझीम हुसेन सयद (४३) व कुबरा खादम सय्यद (३३) तिघेही रा. इंदिरानगर, आंबिवली, ठाणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चिखलदरा परिसरात एक इराणी महिला व दोन पुरुष संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सदर टोळीवर दोन दिवस पाळत ठेवून त्यांच्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी तिघांचीही नावे समोर आली. तिघेही हातचलाखीने गुन्हे करण्यात सराईत असून रायगड जिल्ह्यातील खालापूर व ठाणे जिल्ह्यामधील खडकपाडा ठाण्यातील गुन्ह्यात ते फरार असल्याचेही यावेळी समोर आले. त्यानुसार पथकाने रायगड व ठाणे पोलिसांसोबत संपर्क करुन सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी खडकपाडा व खालापूर पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यात सदर आरोपी पाहिजे असल्याचे कळविले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही अटक केली. त्यानंतर त्यांना संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा – कैदी संख्या वाढल्याने राज्यात आणखी १३ नवी कारागृहे
हेही वाचा – मोफत वीज हवी! अशी आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना…
तिन्ही आरोपींवर विविध भागात फसवणूक तसेच इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, वृषाली वाळसे, नीलेश येते यांनी केली.