वर्ध्यात आयोजित करण्यात आलेल्या ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी विदर्भ साहित्य संघाच्या एका पदाधिकाऱ्याने एका कवयित्रीकडून चक्क १० हजार रुपयांची मागणी केल्याची चर्चा वैदर्भीय साहित्य वर्तुळात रंगली आहे. कवितेचा असा बाजार मांडणारा ‘तो’ ‘प्रतापी’ पदाधिकारी आहे तरी कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- ‘जी-२०’ आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नागपूरचे ‘ब्रॅन्डिंग’ करणार
साहित्य महामंडळाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा वर्धेत होत आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरून कविता सादर करण्याची संधी मिळावी, अशी अनेक कवी-कवयित्रींची अपेक्षा असते. स्थानिक साहित्य संस्था कवितेचा दर्जा पाहून अशी संधी उपलब्ध करून देत असतात. परंतु यासाठी कधी कुणी पैसे मागितले नाहीत. आता मात्र विदर्भ साहित्य संघाच्या एका पदाधिकाऱ्याने एका कवयित्रीला वर्धेच्या संमेलनात कविता सादर करण्यासाठी तब्बल १० हजार रुपये मागितल्याची चर्चा आहे. मुख्य म्हणजे, ही कवयित्री वर्धेचीच आहे. तिने हा संतापजनक प्रकार संस्था प्रमुखांच्या कानावर घातला. त्यानंतर हा मुद्दा नुकत्याच झालेल्या संंघाच्या बैठकीत चर्चेला आल्यानंतर मोठेच वादळ उठल्याची माहिती आहे. अशा कृत्यांमुळे साहित्य संघाची प्रतिष्ठाच धोक्यात येत असून इतके जबाबदार पदाधिकारी असताना तुम्ही कवितेसाठी पैसे मागितलेच कसे, असा संतप्त सवाल साहित्य संघाच्या अध्यक्षांनी त्या पदाधिकाऱ्याला विचारल्याचेही कळते.
हेही वाचा- नागपूर : निवृत्ती वेतनधारकांना आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र
या विषयावर या बैठकीत घनघोर चर्चा झाली. परंतु, हा विषय बाहेर गेल्यास साहित्य संघाची प्रतिमा मलीन होईल या भीतीने ती चार भिंतीआडच संपवण्यात आली. चर्चा संपली, परंतु त्या पदाधिकाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा भाेगावी लागली. त्याची पदावनती झाली. त्याला मूळ पदावर यावे लागले. आता साहित्य वर्तुळातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून संबंधित व्यक्तीला साहित्य संघातून हाकलून लावावे, अशी मागणी केली जात आहे.