गडचिरोली: अवैध संबंधात अडसर ठरत असलेल्या जुन्या प्रियकराची नव्याच्या मदतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आलापल्ली येथे उघडकीस आली आहे. २९ ऑक्टोबररोजी अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरात गोंडमोहल्ला येथे तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. अहेरी पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरवून २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला. प्रेमाच्या त्रिकोणातून हे हत्याकांड घडल्याचे आता समोर आले आहे.
राकेश फुलचंद कन्नाके (३५,रा.श्रमीकनगर, आलापल्ली) असे मृत तरुणाचे नाव असून सचिन लक्ष्मण मिसाळ (३५,रा.गोंड मोहल्ला, आलापल्ली) व शालिनी म्हस्के (३२, रा. गणेश मंदिर परिसर, आलापल्ली) या दोघांचा आरोपींत समावेश आहे.
हेही वाचा… मराठा आरक्षण… नागपूरहून मराठवाड्याकडे निघालेले एसटीचे प्रवासी मध्येच अडकले
राकेश व शालिनीमध्ये मागील नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान राकेशचे लग्न झाले. मात्र,अधूनमधून तो शालिनीला भेटायचा. शालिनीदेखील विवाहित आहे. दोन वर्षांपूर्वी सचिनची शालिनिसोबत ओळख झाली. दोघात जवळीकता वाढली. मात्र, राकेशला सचिन आणि शालिनीचे संबंध खटकू लागले. यातून तिघात वादही झाले होते. दरम्यान, २८ ऑक्टोबरला सचिनचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून शालिनी त्याला भेटायला घरी आली होती. दरम्यान, शालिनिवर पाळत ठेऊन असलेला राकेशदेखील सचिनच्या घरी पोहोचला. यावेळी तिघांमध्ये वाद झाले.
शालिनीने राकेशला धक्का दिल्याने तो सचिनच्या घरासमोरील नालीवर कोसळला. यावेळी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. परंतु सचिन लाकडी फळीने मारतच राहिला. दरम्यान राकेशचा मृत्यू झाल्याचे पाहून दोघांनी त्याचा मृतदेह चिखलात फेकला आणि घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी अंगावर जखमा असलेला राकेशचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी २४ तासातच या हत्याकांडाचा उलगडा केला. पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बालाजी सोनुने, संतोष मरस्कोल्हे, हवालदार किशोर बांबोळे,अंमलदार संजय चव्हाण यांनी आरोपींना जेरबंद केले.