वर्धा : शालेय पुस्तकात जोडण्यात आलेली वह्यांची पाने पालकांसाठी पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधीच ठरणार आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यावर्षीपासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या रचनेत बदल करताना पुस्तकांना वह्यांची कोरी पाने जोडली. त्यावर महत्त्वाच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. शिक्षकांना या नोंदींची यादीच पाठवण्यात आली आहे.
कोरी पृष्ठे ‘माझी नोंद’ या शिर्षकाखाली देण्यात आली आहे. त्याचा उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन एका परिपत्राकातून करण्यात आले आहे. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये. वर्गातील चर्चेत आलेले मुद्दे, अधिकचे प्रश्न, वर्तमानपत्रात विषयाच्या अनुषंगाने आलेल्या माहितीची नोंद, पुस्तकाबाहेरील पूरक माहिती, आकृत्या, पाढे तयार करण्यासाठी, विद्यार्थ्यांना सुचलेल्या नोंदीसाठी, गृहकार्य व अन्य स्वरुपात कोरी पृष्ठे उपयोगात येतील. अशी पाने दिल्याने पालकांना वर्गात काय शिकवले आहे, हे समजण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा – नागपूरमध्ये गडकरींच्या दाव्याला भाजपाकडूनच खो!
वर्गात नेमके काय शिकवले व आपल्या पाल्याने त्याची कशी नोंद घेतली याचे आकलन पालकांना होणार आहे. तसेच अन्य फायदे म्हणजे मुलांचे स्वत:चे संदर्भ साहित्य तयार होईल. ते स्वत:च्या शब्दात स्वत:च्या नोंदी करतील. स्वयंअध्ययन करताना नोंदीचा वापर विद्यार्थी करू शकतील. दफ्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. असे व अन्य फायदे या कोऱ्या पृष्ठांचे सांगितल्या जातात.