लोकसत्ता टीम
नागपूर: वाघिणीपासून दूरावलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पातील बछड्यांना नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात हलवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करत आहेत.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात ‘टी-६६’ वाघिणीचे बछडे पर्यटकांना व क्षेत्रीय गस्तीदरम्यान २३ मे रोजी वाघिणीशिवाय फिरताना दिसले. त्यानंतर त्यांच्या हालचालींवर वनकर्मचारी सनियंत्रण व मागोवा ठेवून होते. दोन ते तीन दिवस वाघीण तिकडे न आल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार त्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. त्यातील एक बछडा अशक्त वाटल्याने त्याचे जवळून निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार मुख्य वन्यजीव संरक्षकांच्या पूर्व परवानगीने त्या बछड्यांना जेरबंद करण्यात आले.
हेही वाचा… दक्षिण अमेरिकेत ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार! कार्यक्रम काय?
यावेळी पशूवैद्यक डॉ. मयूर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगथ यांनी निरीक्षण केले व बछड्यांना तात्काळ औषधोपचार करून पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी यांनी मुख्य वन्यजीव संरक्षकांशी चर्चा परिस्थितीची केली. त्यानंतर बछड्यांना मुख्य वन्यजीव संरक्षकांनी पुढील औषधोचारासाठी गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथे हलविण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी रात्री दोन्ही बछडे गोरेवाडा, नागपूर येथे हलविण्यात आले.
हेही वाचा… बुलढाणा: सैलानीबाबांच्या दर्शनासाठी येणारे वाहन उलटले; २० भाविक जखमी
सदर कार्यवाही क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक प्रमोद पंचभाई, पशू वैद्यकीय तज्ञ डॉ. शिरीष उपाध्ये यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक अतुल देवकर, डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलंगथ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे व इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली.