भंडारा: नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका अंडर ट्रायल कैद्याने जिल्हा कारागृह प्रशासनासह अख्ख्या पोलीस प्रशासनाला तब्बल दोन तास वेठीस धरले. या कैद्याने कारागृहाच्या आवारातील एका पिंपळाच्या झाडावर चढून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. कारागृह प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. मात्र कैद्याने नकार दिला. अखेर पोलीस उपअधीक्षक अशोक बागुल यांनी त्यांच्या समूपदेशन कौशल्याचा वापर करून या कैद्याची समजूत घालून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले आणि त्याचे प्राण वाचविले. दोन दिवसांपूर्वीची घटना आज उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षभरापूर्वीही जिल्हा कारागृहात अशाच प्रकारे एका कैद्याने कारागृहाच्या आवारातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, खैरलांजी गावातील एका खुनाच्या प्रकरणात लिल्हारे नामक एक अंडर ट्रायल कैदी मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्हा कारागृहात आहे. ज्या प्रकरणात तो कारागृहात आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असून लवकरात लवकर त्याचा निकाल लागावा असे या कैद्याला वाटू लागले.

हेही वाचा… देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या….! अकोला- नांदेड महामार्गावर आंदोलकांची घोषणाबाजी

मात्र ‘ तारीख पे तारीख’ मुळे हळूहळू त्याला नैराश्य येऊ लागले आणि त्यातून आत्महत्येचा विचार त्याच्या मनात डोकावल्याचे सूत्रांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी कारागृह प्रशासनाचे लक्ष नसल्याची संधी साधून हा कैदी आवारातील एका पिंपळाच्या झाडावर चढला आणि झाडावरून ‘ मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी झाडावरून उडी घेऊन आत्महत्या करणार ‘ अशी धमकी देवू लागला. कैद्याला झाडावरून खाली उतरविण्यासाठी नानाविध युक्त्या करण्यात आल्या. मात्र कुणावर विश्वास नसल्याचे सांगून त्याने झाडावरून खाली येण्यास नकार दर्शविला. अशातच दीड ते दोन तास गेले.

हेही वाचा… यवतमाळात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले

जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक, भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी सर्वांनी कैद्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कैदी कुणाचेही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हता. अखेर पोलीस उपअधीक्षक अशोक बागुल त्यांच्या सहकाऱ्यांसह कारागृहात आले. बागुल यांनी झाडावर चढलेल्या कैद्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. त्याच्या जीवाचे मोल असल्याचे त्याला पटवून देत त्याचे मनोबल वाढविले. हळूहळू बागुल यांनी त्या कैद्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला लवकरच न्याय मिळवून देण्याची हमी दिली. अखेर बागुल यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हा कैदी झाडावरून खाली उतरला. तो सुखरूप खाली उतरताच बागुल यांनी त्याला प्रेमाने जवळ घेत पुन्हा असे कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे वचन त्याच्याकडून घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An under trial prisoner threatened to commit suicide in the jail premises in bhandara ksn 82 dvr