चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान अयोध्येत उद्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या राममंदिर भूमिपजून कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण देशभर दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र भाजपनेही राज्यात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे विदर्भातील ज्या रामटेकमध्ये (जि. नागपूर) प्रभू रामचंद्र वनवासादरम्यान थांबले होते, तेथील गडमंदिर व इतर विकासाच्या कामांकडे भाजपच्याच सत्ताकाळात दुर्लक्ष झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

नागपूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील रामटेकमध्ये प्रभू रामचंद्राचे ऐतिहासिक मंदिर आहे. वनवासादरम्यान राम येथे काही काळ थांबले होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. येथे देश-विदेशातील रामभक्त दरवर्षी मोठय़ा संख्येने भेट देतात. त्याच्या विकास आराखडय़ाचे काम फडणवीस सरकारच्या काळात रखडले होते.

रामटेकचे भाजपचे तत्कालीन आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी गडमंदिराच्या विकासासाठी पाठपुरावा केला होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने २०१७ मध्ये १५० कोटींचा रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला. प्रत्येकी पन्नास कोटी याप्रमाणे तीन टप्प्यात हा निधी मिळणार होता. या निधीतून पर्यटक निवास, सुविधा केंद्र, अंबाळा तलावाचे सौंदर्यीकरण, तलाव परिसरात तिरुपतीच्या धर्तीवर मुंडण केंद्र, मंदिराकडे जाण्याचा रस्ता, मंदिराची देखभाल दुरुस्ती आणि तत्सम अशी एकूण ४२ कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जाणार होती. मार्च २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यातील ४९ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी सात कोटी रुपयेच प्राप्त झाले. त्यानंतर याच टप्प्यातील दुसरा हप्ता २० कोटी रुपये मंजूर झाला. त्यातील १४ कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीतून ४२ पैकी २४ कामांच्या निविदा काढण्यात आल्या व कार्यादेशही देण्यात आले. २०१८ डिसेंबरमध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजनही झाले. मात्र त्यानंतर एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे ही सर्व कामे अजूनही अर्थवट आहेत.

भाजपचे तत्कालीन आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. अर्थखात्याने निधी मंजूर केला होता. मात्र नगरविकास खात्याने खोडा घातला. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे होते, असेही रेड्डी म्हणाले. त्यानंतर वेळोवेळी निधीसाठी प्रयत्न केले. पण काहीच झाले नाही. हा आराखडा सरकारचा असल्याने विद्यमान सरकारने यासाठी अर्थसंकल्पात निधी द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली होती. मात्र त्याचीही दखल घेण्यात आली नाही, असे रेड्डी म्हणाले.

रामटेक पालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनीही निधीअभावी कामे थांबल्याला दुजोरा दिला. कंत्राटदाराची देणी थकल्याने त्यांनी काम बंद केले. विद्यमान आमदार व सरकारचेही याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या संदर्भात विद्यमान आमदार आशिष जैयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एकूण आराखडयाच्या रकमेपैकी सात कोटी रुपये मिळाले. पण, ५० कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले. उर्वरित रक्कम न मिळाल्याने काम थांबले.

रामटेकचे महत्त्व

राम वनवासात असताना रामटेकमध्ये काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक असे नाव पडले. नागपूरपासून ५० कि.मी. वर असलेल्या रामटेकमध्ये श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर एका गडावर आहे. त्यामुळे त्याला गडमंदिर असेही संबोधले जाते. मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेस येथे यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपूर प्रज्वलित केला जातो.

‘‘युती शासनाच्या काळात रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत २०१७ मध्ये १५० कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यात सात तर दुसऱ्या टप्प्यात फक्त १४ कोटी रुपये मिळाले. अर्थखात्याने निधी मंजूर केल्यावरही नगरविकास खात्याने खोडा घातल्याने निधी मिळाला नाही. त्यामुळे काम थांबले. राम मंदिराच्या विकासाकडे तत्कालीन सरकारने दुर्लक्ष केले.’’

– मल्लिकार्जून रेड्डी, माजी आमदार, भाजप.

‘‘रामटेक विकास आराखडय़ासाठी मंजूर  निधी तत्कालीन सरकारने न दिल्याने कामे रखडली आहेत. विद्यमान आमदारांनी आता यासाठी प्रयत्न करावे.’’

– दिलीप देशमुख, नगराध्यक्ष, रामटेक.