अमरावती : सर्वोच्‍च न्‍यायालयाने माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या जातवैधता प्रमाणपत्राविषयी दिलेला निकाल अयोग्‍य असून त्‍यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात पुनर्विचार याचिका (क्‍यूरेटिव्‍ह पिटीशन) दाखल करण्‍याचा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. त्‍यामुळे नवनीत राणा यांच्‍या अडचणीत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्‍च न्‍यायालयाने जातपडताळणी समितीचा निर्णय अंतिम असल्‍याचे सांगून नवनीत राणा यांना या प्रकरणात दिलासा दिला असला, तरी या निकालाचा देशावर काय परिणाम होईल, याचा विचार केलेला नाही. कुणीही जातपडताळणी समितीला हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्‍या आधारे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ मिळवेल आणि अन्‍यायग्रस्‍तांना दादही मागता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आपण पुन्‍हा याप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे दाद मागण्‍याचा निर्णय घेऊ शकतो, असे आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर : झुल्लरमधील स्फोटाचे कारण स्पष्ट, तापमान वाढल्याने बॉयलर फुटला; जखमींची संख्या वाढली

आपल्याला राज्यपाल करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिले होते. पण आश्वासन देवून काही झाले नाही. काही गोष्टींसाठी मर्यादा असतात. त्यामुळे अजून पंधरा दिवस वाट पाहाणार त्यानंतर मात्र, आपण नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी आश्वासन देवून पंचवीस महिने झालेत, तर अमित शाहांच्या आश्वासनाला अडीच महिने होवून गेलेत. पण अजूनही ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. आता आपण अधिक काळ वाट पाहणार नाही, असे आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>नागपूर : विवाहितेचे दुसऱ्या प्रियकराच्या मित्राशी सूत; चिडलेल्या प्रियकराने गळाच चिरला

विधानसभा निवडणुकीत अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन जागा मागून घेणार असल्याचे आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले. त्यात बडनेरा, तिवसा आणि दर्यापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या जागा या आधी शिवसेना लढली आहे. त्यामुळे त्या यावेळी मिळाल्याच पाहिजेत असा दबाव आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आणू, असेही अडसूळ यावेळी म्हणाले. बडनेरामध्ये रवी राणा हे सध्या आमदार आहेत. ते महायुतीचे घटक आहेत. मात्र, रवी राणांशी आपले काही देणेघेणे नाही आहे. बडनेरा हा शिवसेनाला मिळालाच पाहिजे, असा आपला आग्रह असल्याचे ते म्हणाले.

आनंदराव अडसूळ यांना २०१९ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी पराभूत केले होते. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्‍याचा आरोप करीत आनंदराव अडसूळ यांनी न्‍यायालयात धाव घेतली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anandrao adsul warning about navneet rana caste validity certificate decision of the supreme court mma 73 amy