वर्धा: सध्या अधिक मास सुरू असून जावई बापूंचा भाव चांगलाच वधारला आहे. हा दानाचा महिना म्हणून आपापल्या परीने दान केले जात आहेत. यात सर्वाधिक मान जावयास दिला जातो. हिंदू धर्मात लेकी जावयास लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून मान्यता आहे. या अधिक मासात त्यांना घरी बोलावून यथोचित सत्कार केला जातो.
जावयास कपडेलत्ते, भेटवस्तू, दागिने दिले जातात. पण खाद्यात अनारसे या पारंपरिक पदार्थाचे विशेष महत्व असते. चांदी किंवा तांब्याच्या ताटात तुपात तळलले तेहत्तीस अनारसे देतात. त्याचे भाव चांगलेच वधारले. सध्या ५०० रुपये किलोने ते विकले जात आहेत. तुपाचे ९०० रुपये किलो आहेत. हा पदार्थ सुग्रणीचा कस लावणारा मानला जातो.
चार दिवस तांदूळ पीठ भिजवून त्याचे नंतर लाटन व मग तळण असा व्याप असतो. जाळीदार अनारसे जिला जमते, ती खरी सुग्रन अशी मान्यता आहे. ते आजकाल शक्य होत नसल्याने कॅटरर कडून विकत घेतले जात आहेत. कारण त्याशिवाय जावयाचा मान पूर्ण होत नाही, अशी प्रथा आहे. हा महागडा पदार्थ करणे किंवा विकत आणणे शक्य नसल्यास मोठे बत्ताशे ताटात ठेवले जातात आणि जावयाचे लाड पुरवले जातात.