लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५७ कोटी ९६ लक्ष ९५ हजार ३७५ रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील १४ पुरातत्व स्थळांचा विकास होणार आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांनी नुकताच नियोजन सभागृह येथे आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक अमोल गोटे, आदी उपस्थित होते. चंद्रपूरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिर, प्राचीन गडकिल्ले व वास्तू आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आता त्यांचे रूप पालटणार आहे.

आणखी वाचा-जरांगे-भुजबळ संघर्षावर सहकारमंत्री वळसे पाटलांचे तोंडावर बोट! म्हणाले, “मला वादग्रस्त विषयात ओढूच नका”

मुनगंटीवार म्हणाले, पुरातत्व स्थळांचा विकास करताना कामाची गुणवत्ता, दर्जा आणि कामाची गती यावर स्थानिक नागरिकांनी लक्ष ठेवावे. पुरातत्व विभागाने प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा नागरिकांची टीम तयार करावी. लोकसहभागातूनच या स्थळांचा विकास होईल, याबाबत नियोजन करावे. प्रत्येक ठिकाणी कामांची माहिती देणारा एक फलक तर संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा दुसरा फलक लावावा. यात ‘क्यूआर कोड’चा समावेश असावा. सिध्देश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. माणिकगड किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत असणाऱ्या तीन बारवचे काम उत्तम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुरातत्व विभागाला दिल्या.

अर्थमंत्री असताना भरीव तरतूद

राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्याचे काम पुरातत्व विभागाकडे असते. सुरुवातीला या विभागाचे बजेट प्रतिवर्ष केवळ २२ कोटी रुपये होते. मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात या विभागासाठी ५०० कोटी रुपये मंजूर केले.

आणखी वाचा-चंद्रपूर : बल्लारपूरमध्ये मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी व्हावी क्रीडा प्रबोधिनी, मुनगंटीवार यांची क्रीडा मंत्री यांना पत्राद्वारे मागणी

गाईड प्रशिक्षण संस्था

राज्यातील ऐतिहासिक वारसा बघण्यासोबतच त्याची माहितीही नागरिकांना मिळावी, नागरीकांपर्यंत योग्य व अचूक माहिती जावी, यासाठी राज्यात गाईड प्रशिक्षण संस्था उभारण्याचे नियोजन आहे.

कायापालट होणारी स्थळे

सोमेश्वर मंदिर (राजुरा), महादेव मंदिर (बाबुपेठ, ता. चंद्रपूर), विष्णु मंदिर (माणिकगड, ता. जिवती), सिद्धेश्वर मंदिर (देव्हाडा, ता. राजुरा), माणिकगड किल्ला टप्पा १(ता. जिवती), माणिकगड किल्ला टप्पा २, भवानी मंदिर (भटाळा, ता. वरोरा), ऋषी तलाव (लेणी) (भटाळा, ता. वरोरा), महादेव मंदिर (भटाळा, ता. वरोरा), शंकर मंदिर (भिसी, ता. चिमूर), गरुडस्तंभ (चंद्रपूर), खंडक्या बल्लारशाह समाधी (ता. बल्लारपूर), चंद्रपूर शहर व्यवस्थापन आराखडा (चंद्रपूर) आणि पापामिया टेकडी (ता. चंद्रपूर).

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ancient temples and forts of chandrapur will change their appearance rsj 74 mrj
Show comments