बुलढाणा : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांचे माहेर असलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा. जिल्ह्यात मुगल, निजामशाही, आदिलशाही काळातील ऐतिहासिक खानाखुणा विस्तीर्ण पट्ट्यात ठिकठिकाणी आढळून येतात. याच बुलढाणा जिल्ह्यात ऐतिहासिक भुयार आढळून आले आहे.

आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या एका मोठ्या घराच्या बांधकाम दरम्यान हे भुयार आढळून आले आहे. बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे हे ऐतिहासिक आणि अजूनही सुव्यवस्थित असलेले भुयार आढळले आहे.

घराचे खोदकाम करताना आढळून आलेले हे मोठे भुयार पाहण्यासाठी साखळी बुद्रुक मध्ये अगोदर हजारो गावकऱ्यांची गर्दी जमली. नंतर पंचक्रोशीतील हजारो गावकरी मिळेल त्या वाहनाने साखळी मध्ये दाखल झाले. यानंतर जवळच्या बुलढाणा, चिखली तालुक्यातील नागरिकांची तोबा गर्दी उसळली आहे. बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या साखळी बुद्रुक या गावात इतिहासाची साक्ष देणार भुयारघर सापडलं, ही बातमी ‘सोशल मीडिया’मुळे वेगाने पसरली.

पुरातत्व चा पूढाकार आवश्यक

साखळी बुद्रुक येथील रवींद्र आप्पा साखळीकर यांनी घराच्या बांधकामासाठी पाया खोदणे नुकतेच सुरू केले आहे. हे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणाऱ्या मजुरांना एक मोठा माठ लागला, माठ बाजूला केल्यानंतर खाली चक्क मोठं भुयार दिसून आले, खोदता खोदता ते भुयार एवढ मोठं होत गेलं की बांधकाम करणारे मजूर, गवंडी, घरमालक साखळीकर आणि समस्त गावकरी थक्क झाले.

हा भुयारी रस्ता कुठे जात आहे याचा शोध लागला नसून ते सर्वसामान्य जनतेसाठी अशक्यच आहे. यामुळे  पुरातत्व विभागाने प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करावी व खोदकाम करावे अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

भुयारचा काळ कोणता?

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा नगरीत शिवकालीन पराक्रमी जाधव घराण्याच्या इमारती, जिजाऊचे जन्मस्थान असलेला राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा, त्यांचे समाधी स्थळ, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, बारव हे जाधव घराण्याच्या वैभवाचे साक्षीदार आहे. त्याशिवाय बुलढाणा नजीकच्या देऊळघाट येथे मुगल कालीन गढी, तटबंदीचे अवशेष आहेत. साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथे, रोहिनखेड (ता. मोताळा) येथे निजामशाही, आदिलशाही कालीन अवशेष, पूरातन विशिष्ट बांधकामच्या मशीद, मलकापूर येथे मुगल कालीन प्रवेशद्वार असे अनेक अवशेष आहेत. यामुळे साखळी बुद्रुक येथे आढळून आलेले भुयार कोणत्या काळातील आहे याबद्धल इतिहास, संस्कृती प्रेमीमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुरातत्व विभागाने यासाठी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

Story img Loader