प्राथमिक फेरी दोन दिवसांवर
‘लोकसत्ता’ आयोजित लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्याच्या इच्छेने विद्यार्थीही लिहिते झाले आहेत. यंदा लोकांकिकेचे पाचवे वर्ष आहे. विद्यार्थ्यांनी आधीच या स्पर्धेची तयारी करून ठेवली तर काहींनी स्वत: लिहिलेले नाटक बसवले आहे.
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नाटक, रंगमंच, थिएटर हे परवलीचे शब्द आहेत. एकच विद्यार्थी अनेक कामे करताना दिसतात. ‘लोकांकिका’ची तयारी करणारे विद्यार्थी कधी लेखक, कलाकार, प्रकाश योजनकार, पार्श्व संगीतकार अशा सर्व भूमिकेत वावरत आहेत. त्यामुळे एखादा कलावंत ऐनवेळी येऊ शकला नाही किंवा इतर काही अडचण आली तर ती सांभाळून घ्यायला आधीच पूर्वतयारी सुरू आहे. संहितेच्या बाबतीतही तेच सुरू आहे. बाहेरच्या एखाद्या लेखकावर विसंबून राहण्यापेक्षा आपणच नाटक का लिहू नये, असा प्रश्न महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पडला आणि त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन स्वत:च नाटक लिहिले. लोकांकिकेची प्राथमिक फेरी दोन दिवसांवर येऊन ठेपली असून महाविद्यालयांमध्ये रंगीत तालीम जोमाने सुरू आहे.
यापूर्वीही आमच्या महाविद्यालयाने लोकांकिकेत भाग घेतलेला आहे. यावेळी आम्हीच नाटक लिहिले. संहितेचा विषय आम्हीच ठरवला. संहिता नाटकाच्या साच्यात बसावी म्हणून लेखकाला बोलावले. त्यातील संवादही आम्ही सांगितले. सर्वानी मिळून नाटकाची तयारी केली. लोकांकिकेत आम्ही सादर करणारा विषयच, नाटक कसे उभे झाले, यामागची मेहनत प्रेक्षकांना कळावी हा आमचा उद्देश आहे.
– शुभम भगत, विद्यार्थी, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय.
नाटकासाठी शोधाशोध करावी लागते हे खरे आहे. पण, आम्ही त्यावर मात केली आहे. आमचा नाटकासंबंधीचा एक गट आहे. आम्हीच नाटक लिहिण्यावर भर देतो. कारण संहितेसाठी कुठे अडून रहायला नको. तयारी आधीच करून ठेवली की फायदा होतो. वेळ, पैसा, श्रम सर्वच वाचतात. मला थिएटरमध्येच रस असल्यामुळे संहिता अगोदरपासूनच तयार ठेवण्यावर माझा भर असतो. त्यामुळे तालमीला पुरेसा वेळ मिळतो.
– प्रियंका तायडे, विद्यार्थिनी, धनवटे नॅशनल कॉलेज
प्रायोजक
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.