नागपूर : जाती-धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून असे ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून सर्वच पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले आहेत.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय युवक-युवतीने प्रेमविवाह केल्यास अनेकदा कुटुंबीयांकडून त्यांचा छळ केला जातो. ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकारही घडतात. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि बीड जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’च्या चार घटना घडल्या आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने हालचाली सुरू केल्या असून राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना ‘सेफ हाऊस’ निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवली असून लवकरच प्रत्येक जिल्ह्यात ‘सेफ हाऊस’ निर्माण होणार आहेत.
‘सेफ हाऊस’ निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा पुढाकार घेतला होता. यापूर्वी सातारा येथे सेफ हाऊस तयार करण्यात आले होते. शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. अपेक्षा हीच की, ‘सेफ हाऊस’ फक्त औपचारिकता ठरू नये. नवदाम्पत्यांना विश्वास वाटावा अशी व्यवस्था असावी. शासनाला मदत लागल्यास तयार आहोत. – डॉ. हमीद दाभोळकर, सदस्य, राज्य कार्यकारी समिती म.अंनिस.
सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा
आंतरधर्मीय वा आंतरजातीय विवाह केल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याच्या जीवाला कुटुंबीय किंवा समाजाकडून धोका असेल तर त्यांना ‘सेफ हाऊस’मध्ये ठेवण्यात येईल. तेथे सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा असेल. ‘सेफ हाऊस’मध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क असून एक महिना ते एका वर्षापर्यंत राहता येणार आहे.