अमरावती : पोलिसांवर तुमचा राग असेल, तर पोलिसांकडून सुरक्षा का घेता. केंद्रात, राज्यात तुमचे सरकार आहे, पोलिसांची सुरक्षा काढून का टाकत नाही, असा सवाल करीत पोलिसांच्या कुटुंबीयांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने गुरुवारी राजापेठ पोलीस ठाण्यासमोर नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बुधवारी नवनीत राणा यांनी तरुणी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात राजापेठ पोलीस ठाण्यात पोहचून पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली, तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, त्यामुळे नवनीत राणा यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणा यांच्या भूमिकेबद्दल रोष व्यक्त केला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे त्यांनी टाळावे व त्यांनी तत्काळ पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली. राजापेठ पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
नवनीत राणा या खासदार आहेत, केंद्रामध्ये त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांची सुरक्षा काढून टाकली पाहिजे. त्यांना पोलिसांची सुरक्षा घेण्याचा अधिकार नाही. तुमच्या पाठीमागे फिरणारे हे शासकीय पोलीस कर्मचारी आहेत. कोणत्याही सण उत्सवात ते तुमच्या सुरक्षेसाठी सोबत असतात. पोलीस हे परिश्रम करून पोलीस दलात पोहोचले आहेत. तुमच्या सारखे किराणा वाटून मोठे झाले नाहीत, अशी टीका वर्षा भोयर यांनी केली.