चंद्रपूर : नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, अवैध बांधकाम, न झालेली नाले सफाई, नदी, नाल्यांचे न झालेले खोलीकरण यासोबतच सुस्त महापालिका प्रशासन, कंत्राटदार झालेले नगरसेवक आणि गेल्या दहा वर्षात माजी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या बेधुंद कारभारामुळेच संपूर्ण चंद्रपूर शहर मंगळवार १८ जुलै रोजी पाण्यात बुडाले. या सर्वांना महापालिका प्रशासन, माजी महापौर, माजी नगरसेवक तथा पालकमंत्री व सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप आता संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
महापालिका अस्तित्वात येऊन दहा वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे. या दहा वर्षात शहराच्या विकासात भर पडण्याऐवजी शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. त्याचाच परिणाम दरवर्षी पावसाळ्यात शहरातील सर्व प्रमुख मार्ग पावसाच्या पाण्याखाली येतात. त्याला कारण शहरात जमा होणारे पावसाचे पाणी बाहेर निघण्यास मार्ग नाही. सर्व मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. सर्वत्र अवैध बांधकाम सुरू आहे. या बांधकामांना महापालिकेतील सत्ताधारी, पदाधिकारी, विरोधक आणि अधिकारी या सर्वांचा आशीर्वाद आहे. एखाद्या प्रामाणिक व्यक्तीने अवैध बांधकाम, नाल्यांची अस्वच्छता किंवा अतिक्रमणाची तक्रार केली. तर त्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी तक्रारकर्त्यांला कोणत्या पद्धतीने शांत बसवता येईल यासाठीच अधिक वेळ खर्च केला जातो.
हेही वाचा >>>पावसाचा जोर वाढताच बुरशीजन्य आजाराचे रुग्ण तिप्पट, नायटा, गजकर्णच्या रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे गर्दी
आज समाज माध्यमावर महापालिका अधिकारी तथा माजी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका होत आहे. मात्र याचे काहीही सोयरसुतक माजी पदाधिकाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना नाही.दरवर्षी चंद्रपूर शहर जलमय झाले होते. गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर सर्वत्र गुडघ्यापर्यंत पाणी साचते. याच मार्गाने अधिकारी व पदाधिकारी जाणे येणे करतात. परंतु या मार्गावर पाणी साचू नये यासाठी आजवर कुणीही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. लक्ष्मी नारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय आझाद बगीचा चौक, जयंत टॉकिज या भागात तर माणसाच्या कंबरभर पाणी साचते.
या रस्त्यावरील सर्व दुकानात दरवर्षी पाणी शिरते, परंतु महापालिका काहीही उपाययोजना करत नाही. मोहित मोबाईल, शंकराश्रम, चंद्रपूर वन विभागाचे कार्यालय तथा बगीचा समोरील दुकानांची चाळ शिरते, याच ठिकाणी एक मोठा नाला आहे. परंतु या नाल्याची स्वच्छता दरवर्षी थातूरमातूर पद्धतीने केली जाते. पावसाळ्यात गंज वॉर्ड, श्री टॉकिज, तुकूम तथा वाहतूक पोलीस शाखा कार्यालय, हॉटेल सिद्धार्थ या भागात रस्त्यावर कंबरभर पाणी साचलेले असते. तसेच जलनगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, वडगाव, नगिनाबाग, रामनगर, बिनबा गेट, पठाणपुरा, नागपूर रोड, रहमत नगर, लखमापूर, अंचलेश्वर गेट या भागात अनेक घरात पावसाचे पाणी शिरते, परंतु कायमस्वरूपी काहीही उपाययोजना केली जात नाही.
हेही वाचा >>>खापरखेडा वीज केंद्राचा राख बंधारा फुटल्याने पर्यावरणवादी संतप्त, शेतकरी संकटात
विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्याच पावसात हजारो घरे पाण्याखाली आली. त्यामुळे घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर शहरातील नाले, गटारांची मान्सूनपूर्व साफसफाई करणे आवश्यक होते. मात्र, अनेक भागातील गटारांची व नाल्यांची सफासफाई झाली नसल्यामुळे नाले तुंबल्या गेले. त्यामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसाने महानगर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नदी नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्यानेच शहरातील रस्ते पाण्याने तुडुंब भरले असल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरिक समाज माध्यमातून व्यक्त करीत आहे. पालिका प्रशासनाने नाले सफाई अभियानाचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाल्याची आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा >>>राज्यात २२ ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता
किमान ५० कोटींचे आर्थिक नुकसान
यावर्षी हजारो घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड, अन्नधान्याची नासाडी, फर्निचर तथा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हानी, चारचाकी, दुचाकी व अन्य वाहन मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे. तसेच इतरही हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केला तर किमान ५० कोटीच्या घरात आर्थिक नुकसान झाले आहे. शेकडो घरे व दुकानात पाणी शिरल्याने नुकसानीचा आकडा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.