भंडारा : एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांचे नियोजन बस स्थानक प्रशासनाकडून व्यवस्थित करण्यात येत नसून बस स्थानक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दररोज प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. आज सकाळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली ज्यामुळे प्रवाशांची ऐन वेळी गैरसोय झाली. बस स्थानक प्रशासनाने त्यांची पर्यायी सोय किंवा प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी हात वर केले. त्यामुळे या प्रवाशांचा संयम संपला आणि शेकडो प्रवाशांनी बस स्थानक प्रशासनाला धारेवर धरत तब्बल एक तास बसेस स्थानकातच अडवून ठेवल्या. अखेर पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा विभागातील भंडारा हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने भंडारा बसस्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. यात भंडारा-नागपूर प्रवास करणारा नोकरदार वर्ग, महिला, वृद्ध आणि शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. नोकरदार असो, की विद्यार्थी साऱ्यांचीच नियोजित स्थळी वेळेत जाण्यासाठी धावपळ सुरू असते. एसटी महामंडळाच्या बसने माफक दरात नियोजित ठिकाणी वेळेत जाता येईल, अशी साऱ्यांची अपेक्षा असते. परंतु भंडारा बस स्थानक प्रशासनाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे दररोज प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून वारंवार यासंबंधी तक्रारीसुद्धा केल्या जातात, मात्र अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने प्रभावी संरक्षण व संवर्धन करा, राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वनमंत्री मुनगंटीवारांचे निर्देश

तीन महिन्यांपूर्वी भंडारा आगारात नऊ अत्याधुनिक पद्धतीच्या निमआराम गाड्यांची भर पडली आहे हे विशेष. मात्र एशियाड आणि शिवशाही गाड्यांची संख्या वाढली असली तरी वेळापत्रकाप्रमाणे गाड्या न सोडणे, १० मिनिटांऐवजी अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने गाड्या अशा कारणांमुळे बस स्थानकावरची गर्दी कमीच होत नाही. दररोज दोन दोन तास प्रवाशांना बसची वाट बघत बसावे लागते. बस आली की लगेच फुल्ल होते. त्यामुळे पुन्हा बससाठी ताटकळत बसावे लागते. इतर डेपोमधून येणाऱ्या बसेस बहुतांश फुल्ल होऊन येत असल्याने त्याही थांबत नाहीत. त्यात बस वेळेवर येत नसल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे फावते. नियोजित ठिकाणी जाण्यास वेळ होत असल्याने नाईलाजाने प्रवासी वर्गही खासगी वाहनांना प्राधान्य देण्यात धन्यता मानतो. मात्र बस स्थानक प्रशासनाकडून यावर योग्य तोडगा काढला जातच नाही.

हेही वाचा – अकोल्यातील मोर्णा, विद्रूपा नदीच्या पूरनियंत्रण रेषेला स्थगिती

खिशाला परवडणाऱ्या लाल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असतानादेखील सकाळच्या वेळात दोनच लाल बसेस नागपूरसाठी सोडण्यात येतात. यातच भर म्हणजे सध्या नवरात्रीनिमित्त माहूरसाठी बस सुरू करण्यात आली आहे त्यामुळे एकीडे स्थानिक नियोजन होत नसताना लांब पल्ल्याच्या गाड्या का सुरू केल्या असा रोषही काही प्रवाशांनी व्यक्त केला. सकाळच्या वेळी दहा दहा मिनिटांच्या अंतराने बसेस सोडण्यात याव्यात, सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत नियमितपणे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. एस. टी. महामंडळाने बससेवेसाठी व्यवस्थित नियोजन केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांची सोय होईल आणि पर्यायाने महामंडळाचे उत्पन्नही वाढेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry commuters protest in front of bus station at bhandara buses were stopped at the station for almost an hour ksn 82 ssb
Show comments