लोकसत्ता टीम
यवतमाळ : शेतातील अनधिकृत वीज जोडणी कापण्यासाठी आलेल्या सहायक वीज अभियंत्यास संतापलेल्या शेतकऱ्याने बेदम मारहाण केली. ही घटना राळेगाव तालुक्यातील पिंपरी- सावित्री येथे बुधवारी घडली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे.
पिंपरी-सावित्री येथील शेतकरी प्रकाश देहारकर यांचे पिंपरी ते खैरी मार्गावर शेत आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे रीतसर अर्ज करून (डिमांड) पैशाचा भरणा केला होता. शेतकऱ्याने वारंवार वीज जोडणीसाठी महावितरणकडे विनंतीदेखील केली. मात्र, जोडणी न मिळाल्याने हाताशी आलेले पीक करपू लागले. त्यामुळे शेतकरी देहारकर यांनी वीज खांबावर तात्पुरत्या स्वरुपात केबल टाकून पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा-हिवाळी अधिवेशनात शिंदे समितीच्या अहवालावर चर्चा घडवून आणा, ओबीसी मुक्ती मोर्चाचे आवाहन
राळेगाव येथील महावितरणचे अभियंता गिरी यांना ही माहिती मिळाली. त्यांनी देहारकर यांचे शेत गाठून अनधिकृत वीज जोडणी काढून घेतली. दरम्यान, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले पीक करपून जाईल व वर्षभर केलेली मेहनत वाया जाईल, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने गिरी यांना केबलनेच बेदम मारहाण केली. याप्रकरणी अभियंता गिरी यांनी वडकी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी देहारकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शेतकरी देहारकर यांना अटक करण्यात आली आहे. वीज जोडणी देण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात असंतोष आहे. त्यातूनच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.