बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी जळगाव उपविभागीय कार्यालयावर संतप्त पूरग्रस्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. आठवडाभरात अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतील घोळ संपवून संकटग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली. असे न झाल्यास पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने नसेल व त्याचे परिणाम शासन-प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी हजारो शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडताना ते म्हणाले की, मागील २३ जुलै २०२३ रोजी जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामधे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली, शेतीपिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले, हजारो लोक बेघर झालीत, गुरेढोरे मोठ्या प्रमानात मृत पावली. त्यावेळी आमदार, खासदार सर्वपक्षीय नेत्यांनी गावागावात भेटी दिल्या. झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, नुकतेच प्रशासनाने शेतीच्या नुकसानीच्या याद्या जाहीर केल्या. याद्यांत मोठा घोळ झाल्याचे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यामधे नदी-नाल्यांकाठी असलेल्या जमिनीचे नुकसान झालेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना वगळण्यात आले. निधी वाटपात नुकसानग्रस्तांवरच अन्याय होऊन मोठी तफावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुरग्रंस्तामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नुकसान भरपाई याद्यांमध्ये झालेल्या घोळचा जाब पाटील यांनी यावेळी प्रशासनाला विचारला.

हेही वाचा – हिंगोलीच्या सभेला का गेलो नाही, वडेट्टीवार स्पष्टच बोलले

हेही वाचा – मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेल्या रविकांत तुपकरांना शासकीय बैठकीचे निमंत्रण; म्हणाले…

मदतीत राजकारण नको

चर्चेअंती हजारो अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज प्रशासनाला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तक्रारीचे निवारण येत्या ८ दिवसांत करून न्याय द्यावा, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र राहणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. यात कोणतेही राजकारण करू नका. अशी तंबीही पाटील यांनी दिली. आंदोलनात शेतकरी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry flood affected farmers and workers enter jalgaon sub divisional office under the leadership of ncp state general secretary prasenjit patil scm 61 ssb