गोंदिया : तो बालपणा पासूनच इतका हुशार की वर्गात नेहमी प्रथम क्रमांक पटकवायचा. शालेय शिक्षण झाल्यानंतर गोंदियातील एका खासगी शिकवणीतून त्याने जेइइचा अभ्यासक्रम प्राविन्य सूचित स्थान मिळवून थेट आयआयटी खरगपूर गाठले.

येथे नुकत्याच कॅम्पसमध्ये त्याला २४ लाखाच्या पॅकेजवर नोकरी सुद्धा मिळाली होती. सोमवार २१ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या परीक्षेनंतर तो जॉईन करणार होता. पण अचानक असं काय झाले की गोंदिया येथील कुंभारे नगर (नाना चौक) राहणाऱ्या त्याच्या वालकर कुटुंबाला रविवार २० एप्रिल रोजी अनिकेत दिपककुमार वालकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. यामुळे संपूर्ण वालकर कुटुंब पुरते हादरून गेले.

काही काळापुरते तर कुटुंबीयांना विश्वास होत नव्हता. पण अखेर गोंदिया येथील घरी असलेल्या मोठा भाऊ, आई आणि वहिनीने स्वतः ला सावरून ही बातमी कुटुंबातील इतराना सांगितली. माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील भाऊ,आतेभाऊ आणि आई अनिकेतचा मृतदेह आणायला आयआयटी खरगपूर वसतिगृहात गेले आहे. बुधवारी सकाळी १० वाजतापर्यंत गोंदियाला येणार असल्याची माहिती अनिकेतचे काका धनंजय वालकर यांनी  दिली.

वालकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत दीपक वालकर हा आयआयटी-खरगपूर येथे चौथ्या वर्षाचा पदवीधर विद्यार्थी होता. आयआयटी-खरगपूरच्या जेसी बोस हॉल ऑफ रेसिडेन्समधील त्याच्या खोलीत रविवारी संध्याकाळी अनिकेतचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. अशी माहिती आयआयटी-खरगपूर प्रशासन कडून रविवारी गोंदियातील वालकर कुटुंबीयांना कळविण्यात आली.

अनिकेत वालकर (२२) हा महासागर अभियांत्रिकी आणि नौदल वास्तुकला विभागातून दुहेरी पदवी घेत होता. सोमवार २१ एप्रिल पासून त्याची शेवटची सत्र परीक्षा सुरू होणार होती. तो एक चांगला विद्यार्थी होता व त्याला इंटर्नशिप मिळाली होती. याच १७ एप्रिलला आयआयटी-खरगपूर येथे एका फेअरवेल कार्यक्रमात त्याने आपल्या कुटुंबातील मोठ्या भावाला बोलावले होते.

त्याचा मोठा भाऊ सुदीप दीपक वालकर हा अनिकेतला भेटून शनिवार १९ एप्रिल २०२५ ला भेटून गोंदियाला आला व रविवारी (२० एप्रिल) अनिकेतच्या मृत्यूची बातमी आली. अनिकेतला वडील नाही. त्यांचा कोरोनात मृत्यू झाला होता, असे अनिकेत चे काका धनंजय वालकर यांनी बोलताना सांगितले.