नागपूर : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड या प्रकरणांमुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याना मी निलंबित केले होते. त्यामुळे, दोघांनी एकत्र येऊन मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले. दोघांच्या मागे कुणी मास्टरमाइंड आहे, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
तब्बल २१ महिन्यानंतर शनिवारी ते नागपुरात परतले. यावेळी विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात असले. पत्रकारांशी बोलतांना देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड ही दोन्ही प्रकरणे गंभीर होती. ही प्रकरणे गृहमंत्री असतांनाही माझ्यापासून लपून ठेवली गेली. त्यामुळे सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना निलंबित केले. कालांतराने वाझे यांना बडतर्फही केले. परमबीर सिंहांच्या ऐकीव माहितीवरून माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे तथ्यहिन आरोप झाले. परंतु, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात हे आरोप खोटे ठरत आहेत. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातही १०० कोटींऐवजी १.७१ कोटी रुपये दाखवले गेले. या आरोपांमागे कोणती शक्ती होती, हे माझ्यापेक्षा पत्रकारांनाच जास्त माहीत असल्याचा टोलाही देशमुखांनी लगावला.
हेही वाचा – भारतीय राज्यघटना एक असामान्य निर्मिती; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे भाष्य
हेही वाचा – अनिल देशमुख म्हणाले, “कारागृहात माझा प्रचंड छळ, दहशतवादी कसाबला ठेवलेल्या..”
मी आता या मास्टरमाइंडची माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न केल्यास पत्रकारांना सांगेल,असेही देशमुख म्हणाले. सचिन वाझेच्या बयानावरून मला अटक करण्यात आली. परंतु, वाझेवर दोन खुनांचे आरोप असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचे बयान ग्राह्य धरता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितल्याचे देशमुख म्हणाले.