गडचिरोली : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यासह परराज्यांतही विस्तार केला. अनेकांना मंत्री केले, मानसन्मान दिला, सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. पण, तेच आज सोडून गेले. ८३ वर्षांच्या बापाला कोणी सोडून जातं का, असा सवाल करून माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी भावनिक साद घातली. भाजपाचे आमदार नाराज आहेत, तेच येणाऱ्या निवडणुकांत त्यांना हात दाखवतील, असा टोला त्यांनी लगावला.
येथील चंद्रपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात १२ जुलै रोजी अनिल देशमुख यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्र वैद्य, मुनाफ पठाण, चामोर्शी बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, जगन्नाथ बोरकुटे, सुरेश नैताम, राजाभाऊ आत्राम, ॲड. संजय ठाकरे, सुरेश परसोडे आदी उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख यांनी भाजपावर चौफेर टीका केली. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवून भाजपाने फोडाफोडीचे राजकारण करून तमाशा केल्याचा टोला त्यांनी लगावला. काल पक्षासोबत आलेल्यांना लगेचच मंत्रीपद दिले जात आहे, त्यामुळे नाराजीची परिस्थिती आहे. ५० खोके देऊन सोबत गेलेल्या ४० पैकी पाचही आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
धर्मरावबाबा विरोधक एकवटले
आजपर्यंत जिल्ह्यात धर्मरावबाबा आत्राम म्हणजे राष्ट्रवादी असे समीकरण होते. त्यामुळे शरद पवारांना मानणारा वर्ग दाबला गेला होता. पक्षातील फुटीमुळे हा गट जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला असून त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. बुधवारच्या कार्यकर्ता मेळाव्यात हे सर्व नेते एकवटल्याचे चित्र होते.