नरखेड बाजार समितीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाच्या सभापतीविरोधात आशीष देशमुख यांच्या गटाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. शुक्रवारी ( २६ मे ) यासाठी पार पडलेल्या मतदानात अनिल देशमुख यांच्या गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख यांचाच सभापती राहणार असल्याचं निश्चित झालं आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, “आशीष देशमुख भाजपा आणि शिवसेनेने बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. पण, त्यांना आवश्यक असलेली १२ मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा मोठा विजय झाला आहे. निवडणूक होण्यापूर्वी काही नेते मोठे-मोठे दावे करत होते, मात्र आज ते तोंडघशी पडले आहेत.”
हेही वाचा : “भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे”, गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “लोकसभेला…”
“ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी निरोप दिल्यानंतर सुद्धा…”
बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटातील सदस्य विरोधात गेल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल विचारल्यावर अनिल देशमुखांनी म्हटलं, “महाविकास आघाडीत आम्ही ठाकरे गटाबरोबर एकत्र आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी निरोप दिल्यानंतर सुद्धा राजू हरणे यांनी ऐकलं नाही. त्यांनी भाजपाबरोबर आघाडी केली. तरीही त्यांचा पराभव झाला.”
“आशीष देशमुखांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही”
आशीष देशमुख काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारल्यावर अनिल देशमुखांनी खिल्ली उडवली आहे. “आशीष देशमुख हे आंतरराष्ट्रीय नेते आहेत. त्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही,” असं अनिल देशमुखांनी म्हटलं.