नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक वर्षे प्रफुल्ल पटेल होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ते पहिल्या क्रमांकाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू होते. जर विदर्भात पक्ष वाढला नसेल तर तेच अपयशी ठरले, असा त्याचा अर्थ होतो, असे प्रतिउत्तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा काही दिवसांपूर्वी नागपुरात मेळावा झाला. त्यावेळी पटेलांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती. त्याला आज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर दिले. या मेळाव्यात अनिल देशमुख यांचे नाव न घेता प्रस्थापित नेत्यांच्या काळात विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसाचा पक्षाचा विस्तार झाला नाही.
अनेक वर्षे मंत्रीपद मिळूनही काटोलच्या बाहेर पक्ष वाढला नाही, अशी टीका प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी देशमुख यांच्याविरोधात केली होती. याकडे देशमुख यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल विदर्भात पक्षाचे सर्वोच्च नेते होते. त्याबाबत तेच सांगत आहेत. मग असे असताना पक्ष विदर्भात वाढला नसेल तर त्यास कोण जबाबदार असेल?
हेही वाचा… सख्ख्या भावंडांची पोलीस दलात निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. त्याचा प्रत्यय आमच्या दौऱ्यातून दिसून येत आहे. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दौरे सुरूच राहणार आहेत. शरद पवार यांची सभा पुढील महिन्यात भंडारा-गोंदिया येथे प्रस्तावित आहे. तसेच नोव्हेंबमध्ये नागपुरात मेळावा घेण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले.