निकटवर्तीय ताब्यात, समर्थकांची घोषणाबाजी
नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्य़ातील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास छापे टाकले.
‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांचे निकटवर्तीय पकंज देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. ‘ईडी’च्या छाप्याची माहिती मिळताच देशमुख यांचे समर्थक त्यांच्या घरासमोर जमा झाले आणि त्यांनी कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. भष्ट्राचाराच्या आरोपानंतर देशमुख यांच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा लागला आहे. रविवारी सकाळी त्यांच्या वडिलोपार्जित घरी ‘ईडी’च्या चार अधिकाऱ्यांनी छापा घालून घराची झडती घेतली. देशमुख यांची वडविहिरा येथे शेती आहे. शेतीचे काम पाहणारे व्यवस्थापक पंक ज देशमुख यांना ‘ईडी’ने ताब्यात घेतले.
‘ईडी’ने रविवारी केलेल्या कारवाईच्या वेळी अधिकाऱ्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही होते. नागपूर जिल्ह्य़ाच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. कारवाईच्या वेळी या दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते. गृहमंत्री असताना देशमुख यांनी मुंबई पोलिसांना बारमालकांकडून १०० कोटी वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप आहे.