नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ नावाने जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढेच ते त्यांच्या करामतींनीसुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणूनच मग सर्वसामान्य पर्यटक, वन्यजीवप्रेमी,  ‘सेलिब्रिटी’ पर्यटक त्यांना पाहण्यासाठी आपला मुक्काम वाढवून घेतात. भारतीय क्रिकेटमधला ‘स्पिनर’ अनिल कुंबळे यांनेही ‘छोट्या मटक्या’ ची ( वाघाचे नाव) एक झलक पाहण्यासाठी ताडोबातील त्याचा मुक्काम वाढवून घेतला. क्रिकेटपटू अनिल कुंबळेने त्यांच्या ताडोबातील  सफारीची सुरुवातच बफर क्षेत्रातून केली. एरवी पर्यटक ताडोबाच्या गाभा क्षेत्रात पर्यटनाला पसंती देतात. अलीकडेच येऊन गेलेला ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडूलकरनेसुद्धा ताडोबाच्या गाभा क्षेत्रातून सफारीची सुरुवात केली. त्यानंतर ते बफरमध्ये गेले. मात्र, अनिल कुंबळे सातत्याने बफरक्षेत्रातच सफारी करत आहे, असे वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे व कांचन पेटकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारच्या सफारीत त्याला निमढेला प्रवेशद्वारातून ‘भानूसखिंडी’ आणि तिचे तीन बछडे ‘नयनतारा’, ‘राम’, ‘लक्ष्मण’ यांनी मनसोक्त दर्शन दिले. त्यानंतर तो गाभा क्षेत्रातील खडसंगीकडे गेल, पण येथे व्याघ्रदर्शन झाले नाही. रात्री त्याने मुक्कामाचा बेत आखला आणि त्याने ‘पगडंडी’ या खासगी रिसॉर्टमध्ये मुक्काम ठोकला. शुक्रवारी पुन्हा कुंबळे यांनी वनविभागाच्या वाहनाने निमढेला बफर क्षेत्रात दिवसभर सफारी केली. या क्षेत्रात ‘छोटा मटका’ या वाघाचे वास्तव्य आहे आणि त्याच्या एकापेक्षा एक पराक्रमाचे किस्से ऐकूनच कुंबळे यांना त्याच्या दर्शनाची आस लागली. मात्र, ‘छोटा मटका’ शेवटपर्यंत त्याच्यासमोर आलाच नाही आणि त्याने कुंबळेला हुलकावणी दिली. निमढेला क्षेत्रात ‘छोटा मटका’, ‘भानूसखिंडी’ व तिचे तिन्ही बछडे यांनी पर्यटकांना अक्षरश: वेड लावले आहे. पर्यटकांचा ओघ असूनही येथे वनरक्षक मिलिंद किटे व त्यांच्या चमूने या क्षेत्राचे व्यवस्थापन अतिशय उत्तमरितीने सांभाळले आहे.  शुक्रवारी अनिल कुंबळे याने स्वत: या चमूसोबत आवर्जून छायाचित्र काढून घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble extended his stay in tadoba andhari tiger reserve to catch a glimpse of the tiger rgc 76 zws