लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: जिल्ह्याच्या सीमावर्ती व सातपुडा पर्वतरांगातील आणि मेळघाट प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या वाघांच्या अधिवासाने समृद्ध अंबाबरवा अभयारण्यात उद्या ५ मे रोजी प्राणिगणना करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने याची जय्यत तयारी केली असून त्यावर आज अंतिम हात फिरवण्यात येत आहे. ‘पट्टेदार राजा’ची संख्या वाढण्याच्या अपेक्षेने कर्मचाऱ्यांत उत्साह दिसून येत असला तरी गणनेत सहभाग नाकारल्याने वन्यजीवप्रेमी नाराज आहेत.

या पार्श्वभूमीवर उद्याच्या गणनेचे जय्यत नियोजन करण्यात आले आहे. ३५ पाणवठ्यावर अधिकारी, कर्मचारी दुपारपासून तैनात राहणार आहेत. ३५ मचाण उभारण्यात आले आहेत. मचाणनिहाय अधिकारी, वन्यजीव विभाग वनमजूर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यंदा निसर्ग अनुभव कार्यक्रमाला वन्यप्रेमींना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

हेही वाचा… धक्कादायक! चार वर्षांपूर्वी मृत व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेचे ‘व्हाउचर’

१४ हजार हेक्टर क्षेत्र

१४ हजार हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेल्या अंबाबरवा अभयारण्यात एकूण ५ वर्तुळ तर १९ बीट आहेत. निसर्ग अनुभव कार्यक्रम ८ नैसर्गिक तर २७ कृत्रिम अशा ३५ पाणवठ्यांवर पार पडणार आहे. ३५ मचाणावर १ कर्मचारी व १ वनमजूर बसून प्राण्यांची गणना करणार आहेत. प्रत्यक्ष नजरेत दिसून येणाऱ्या वन्यजीवाची गणना महत्त्वाची ठरणार आहे. प्राणिगणनेसाठी १९ वनरक्षक, ५ वनपाल, ४ विशेष व्याघ्रदलाचे जवान ४२ मजूर २४ तास कर्तव्यावर राहणार आहेत. गतवर्षी वाघ बिबट्यांसह ८०१ वन्यप्राण्यांनी दर्शन दिले होते.

हेही वाचा… वज्रमूठ सभांचे फेरनियोजन; नाना पटोले म्हणाले, “मोदी सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव”

यंदा वाघांची संख्या वाढणार?

माणसांनी जिल्ह्यांच्या कृत्रिम सीमा केल्या आहेत. मात्र निसर्ग व निसर्गपुत्र असलेल्या प्राण्यांना कोणतीच मर्यादा नाही. अंबाबरवा हे सातपुडा पर्वतराजीत आणि वाघांचा अधिवास असलेल्या विस्तीर्ण परिसरात मोडते. जिल्ह्यातील या अभयारण्यात वाघ सुद्धा आहेत. यामुळे खामगाव नजीकच्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या तुलनेत अंबाबरवाची ‘आन-बान-शान’ वेगळी आहे. गतवर्षी गणनेत ६ वाघ आढळून आले होते. त्यातुलनेत बिबट्याच्या संख्येत वाढ होते काय, ही देखील उत्सुकता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal census will be held on 5th may in amba barwa wildlife sanctuary buldhana scm61 dvr