लोकसत्ता टीम
अमरावती: जनावरांची अवैध वाहतूक करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. ग्रामीण पोलिसांनी सावरखेड नजीक कारवाई करून एक अनोख्या प्रकारची तस्करी उघडकीस आणली आहे. तस्करांनी ट्रकच्या मागच्या बाजूने कुलर ठेवून आतमध्ये तब्बल ५२ गोवंशीय जनावरे कोंबून नेण्याचा प्रयत्न केला. शिरखेड पोलिसांनी तो हाणून पाडला.
शिरखेड पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अमरावती ते मोर्शी मार्गावर सावरखेड बस थांब्यावर एमएच ४० / सीएम ११७९ क्रमांकाचा आयशर कंपनीचा ट्रक अडवला. पोलिसांनी ट्रकची कसून तपासणी केली तेव्हा ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ट्रकचालकाने जनावरे दिसू नयेत, म्हणून बाहेरच्या बाजूने कुलर ठेवले.
आणखी वाचा- अकोल्यात ठिपकेदार ‘सुरमा’चा सुखावणारा वावर; पाणवठ्यांवर दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन
जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था देखील करण्यात आली नव्हती. जनावरांचे तोंड, पाय बांधलेल्या अवस्थेत होते. या जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी ट्रक जप्त केला. जनावरांची किंमत सुमारे २ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी ट्रकचालक आरोपी शरीफ खान शकूर खान (३२, रा. कुरवाई, जि. विदिशा, मध्यप्रदेश), तसेच त्याचा सहकारी चंदन उमरावसिंग पुशपद (३९, रा. सारंगपूर, जि. राजगड, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात भादंवि ४२९ च्या विविध कलमांसह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, सहकलम ९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५, मोटार वाहन कायदा ९१, ८३, ११९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोवंशीय जनावरांची तस्करी रोखण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत. ही कारवाई अपर अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कडूकार यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार मनोज टप्पे, श्याम चुंगडा, अजय अडगोकर, अमित राऊत, समीर मानकर यांनी केली आहे.