नागपूर : मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच माजी मंत्री अनिस अहमद यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाल्याने उमेदवारी अर्ज भरता आले नसल्याचे सांगण्यात येत असेल तरी राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या अनीस अहमद यांची वेळ चुकली की चुकवल्या गेली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता ते मुंबईतील काँग्रेस मुख्यालयात पोहचल्याने विरोधकांचे मतविभाजनाचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अहमद यांची ही राजकीय खेळी होती हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसने मध्य नागपूरमधून मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मुस्लीम समाजावर अन्याय झाला, असे सांगत अनिस अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढण्याचे निर्धार केला. त्यासाठी ते सोमवारी तातडीने मुंबईला गेले आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ते वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले देखील. पण, एक मिनिट विलंब झाल्याने त्यांना अर्ज भरता आला नाही. अनिस अहमद यांनी अनेकदा मंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधीचे नियम, बारकावे यांची निश्चित कल्पना आहे. असे असताना त्यांची वेळ चुकलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुस्लिम समाजाची सर्वांधिक मते काँग्रेसला जातात, असा अनुभव आहे. त्यामुळे अनिस अहमद हे मध्य नागपूरमधून रिंगणात असल्याचे सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे बंटी शेळके यांना होणार होते. तर मुस्लिमांच्या मतांचे विभाजन होण्याचा धोका होता. तर मतांच्या विभाजनाचा फायदा साहजिक भाजप उमेदवाराला झाला असता. पण, ऐनवेळी अनीस अहमद यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने काँग्रेसला दिलासा तर भाजपला धक्का बसला आहे. या घडामोडीनंतर अनिस अहमद यांना खरच विलंब झाला की, ही राजकीय खेळी होती, अशी चर्चा रंगू लागली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून मुस्लीम आणि हलबा समाजाचा आग्रह होता. परंतु काँग्रेसने मागील निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेल्या बंटी शेळके यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे मुस्लीम आणि हलबा समाजाची नाराजी आहे.
हेही वाचा – राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
अनिस अहमद यांनी बहुजन वंचित आघाडीत प्रवेश केला आणि त्या पक्षाकडून ते मध्य नागपूर मतदारसंघात लढणार होते. परंतु त्यांनी आज मुंबईत काँग्रेस कार्यालयात जावून काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. यासंदर्भात ते म्हणाले, त्यांनी कधीही काँग्रेसचा राजीनामा दिला नव्हता. केवळ वंचित आघाडीचे एबी फार्म घेतले होते. ते काँग्रेसमध्ये राहणार आहेत.
© The Indian Express (P) Ltd