नागपूर : २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता विज्ञान भवनातील उद्घाटनीय स्थळाला दिवंगत विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना पाठवले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पत्रानुसार, साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आग्रही विज्ञानवादी होते. दाभोलकरांनी लिहिलेली १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना या साप्ताहिकाचे ते अनेक वर्ष संपादक होते.
हेही वाचा >>> संस्थाचालकांनो, ६ जानेवारी लक्षात ठेवा आणि सहभागी व्हा
समाजाला विवेकशील करण्यात दाभोळकरांचे मोठे योगदान आहे. त्यांचे हे सर्व समाजाभिमुख कार्य लक्षात घेता साहित्य संमेलनाच्या विज्ञान भवनातील उद्घाटनीय स्थळाला डॉ. दाभोलकरांचे नाव देणे सर्वाथाने योग्य ठरेल, असेही या पत्राद्वारे समितीच्या राज्य कार्यकारणीचे सल्लागार सदस्य श्रीपाल ललवाणी, पुणे शहर कार्याध्यक्ष अनिल वेल्हाळ यांनी महामंडळाचे लक्ष वेधले आहे. सोबतच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनाही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
शरद पवारांनाही साकडे
अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी दाभोलकरांनी आयुष्यभर लोकप्रबोधन केले. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी मोठा लढा उभारला आणि अखेर समाजहितासाठी लढता-लढता ते शहीद झाले. एक विज्ञानवादी मराठी माणूस म्हणून दाभोलकरांचा देशपातळीवर मोठा लौकिक होता. त्यामुळे राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटनीय स्थळाला दाभोलकरांचे नाव देण्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून आपण स्वत: पुढाकार घ्यावा, अशी विनंती ‘अंनिस’ने शरद पवार यांना पत्राद्वारे केली आहे.