वर्धा: भूक असो की नसो कोणासही खायला काही चवदार मिळाले की तो स्वाद घेतोच. आणि मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल तर मग खवय्याच्या उड्या तर पडणारच.  उपजत सुगरण असणाऱ्या महिलांचा हा महोत्सव आहे. येथील सर्कस ग्राउंड मैदानावर ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटाच्या कलागुणांचा वर्धिनी महोत्सव भरला आहे. विविध पदार्थ, वस्तू, धान्य व अन्य बाबींची प्रदर्शनी व विक्री सूरू आहे. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ते चालणार. आतापर्यंत दहा हजारावर  लोकांनी भेट दिल्याचे व्यवस्थापक मनीष कावडे सांगतात. कारण खाद्य व अन्य वस्तूच नव्हे तर रोज विविध प्रकारचे मनोरंजनपर उपक्रम पण आहेत.

सकाळी ११ ते रात्री ११ दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात प्रामुख्याने खाद्य पदार्थांवर गर्दी उसळत असल्याचे चित्र आहे. मांसाहारी खवय्या  असेल तर खेकडे, झिंगे, चिकन, मटण, बिर्याणी, बटेर  अशी रेलचेल आणि शाकाहारी असल्यास भरीत, झुणका भाकर, दही,पाटोळी,ठेचा, पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड व अन्य पदार्थ अस्सल गावरानी चवीत उपलब्ध आहेत. ते पण माफक दरात. कोणीही दर पाहून नाके मुरडत नसल्याचा अनुभव. तसेच औषधी गुणधर्म असलेली हळद, मसाले, तिखट, पापड कुरड्या धापोडे, सरगुंडे, शेवळ्या, मध, लोणचे, नैसर्गिक गूळ व तत्सम पदार्थ आहेत. उन्हाळ्याची बेगमी म्हणून शहरी महिलांची धाव दिसते. गावात उपलब्ध कच्चा व रसायनमुक्त मालापासून हे जिन्नस महिलांनी तयार केल्याचे सांगण्यात येते. रात्री तर आयोजक मंडळीस पण खायला शिल्लक दिसत नसल्याचे चित्र दिसून आले.

सोबतीला मनोरंजन पण आहेच. कवी संमेलन आटोपले. आज स्थानिक कलाकारांचा आर्केस्ट्रा बँड तर रविवारी नृत्य स्पर्धा रंगणार. सोमवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. उमेद व वर्धा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त आयोजनातील हा महोत्सव आहे. ग्रामीण चव, दर्जेदार उत्पादने व सुंदर हस्तकलेचा हा संगम असल्याचा दावा आयोजक करतात. आयोजनात मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, वरिष्ठ अधिकारी सुरज गोहाड, नीरज नखाते यांच्या देखरेखीत मनीष कावडे, प्रतीक मुनेश्वर, सुरज बोबडे, रवी लाटेलवार व तालुका अभियान व्यवस्थापक जबाबदारी सांभाळत आहे. महिलांनी लावलेले स्टॉल व त्यांची सरबराई अवश्य बघावी, असे आवाहन आहे.

Story img Loader